Haryana Shocker: मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचं सांगत पतीने पत्नीला दीड वर्षांपासून शौचालयात कोंडलं; पोलिसांनी केली सुटका
हरियाणा मध्ये पानिपत मधील रिसपूर गावामध्ये एका पतीने त्याच्या 35 वर्षीय पत्नीला सुमारे दीड वर्ष शौचालयामध्ये कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे.
हरियाणा मध्ये पानिपत मधील रिसपूर गावामध्ये एका पतीने त्याच्या 35 वर्षीय पत्नीला सुमारे दीड वर्ष शौचालयामध्ये कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे. महिला सुरक्षा आणि बाल विवाह निषेध अधिकारी (Women Protection and Child Marriage Prohibition Officer)यांची टीम घटनास्थळी पोहचली आणि त्या महिलेची सुटका केली आहे. या महिलेची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. तिच्या अंगाला घाण लागली होती तर चालणं, उभं राहणं देखील कठीण झालं होतं. सनौली पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
महिला सुरक्षा आणि बाल विवाह निषेध अधिकारी रजनी गुप्ता यांनी मंगळवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, एक टीम बनवण्यात आली आणि सनौली पोलिसांनी रिसपूर मध्ये नरेशच्या छतावर छापा टाकला आहे. पती नरेश घरामध्ये गेला. त्याने पोलिसांना सुरूवातीला हाकलण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत पोलिस पहिल्या मजल्यावर पोहचले होते. त्यांनी टॉयलेटची चावी मागून टाळं उघडलं तर त्यांना आतमध्ये पत्नी दिसली. तिच्या शरीरावर मल-मूत्राची घाण लागलेली होती. जेव्हा पोलिसांनी तिला बाहेर काढलं तेव्हा ती उठू देखील शकत नव्हती. शरीरात केवळ हाडांचा सापळा राहिलेल्या अवस्थेमध्ये ती होती. पतीचा दावा आहे की पत्नी मानसिकरित्या त्रस्त आहे. तिच्यावर 3 वर्ष उपचार सुरू आहेत पण अखेर तिला आतमध्ये बंद केले.
दरम्यान या दांमप्त्याला एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत मात्र त्यांनीदेखील कधी विरोध केला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं 17 वर्षांपूर्वी लग्न झालं होते. त्यांची मुलगी 15 वर्षांची 11 आणि 13 वर्षांचे मुलगे आहेत. दुर्देवाची बाब म्हणजे या मुलांसमोरच पती पत्नीला मारझोड करत होता. उपाशीपोटी शौचालयात कोंडून ठेवत होता. घरगुती हिंसाचाराचा खटला सुरु असताना महिलेला सासरचे कुटुंब घराबाहेर काढू शकत नाहीत; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय.
पोलिसांनी महिला आणि बाल संरक्षण अधिकारी रजनी गुप्ता यांच्या तक्रारी नंतर पती विरोधात कलम 498 A आणि 342 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पतीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू आहे.