'Har Ghar Tiranga' Campaign: 'हर घर तिरंगा' मोहिमेद्वारे 600 कोटी रुपयांचा व्यवसाय, तर 10 लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज
तिरंगा रॅली, तिरंगा मार्च, तिरंगा गौरव यात्रा, स्वराज मार्च असे कार्यक्रम होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'हर घर तिरंगा अभियान' (Har Ghar Tiranga Campaign) देशभरात अतिशय उत्साहात साजरे करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. या मोहिमेमुळे या वर्षी देशभरात सुमारे 35 कोटी तिरंगा ध्वजांची विक्री होण्याची अपेक्षा कॅटला आहे. त्यातून सुमारे 600 कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही विक्री सुमारे 500 कोटी रुपये होती. कॅटने देशातील सर्व व्यावसायिकांना 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या दुकानांवर आणि घरांवर राष्ट्रध्वज लावावा आणि कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वाटावा, असे आवाहन केले आहे.
देशभक्ती आणि स्वयंरोजगाराशी संबंधित या मोहिमेमुळे देशभरातील लोकांमध्ये देशभक्तीची अद्भुत भावना निर्माण झाली असून, सहकारी व्यवसायाच्या मोठ्या संधी खुल्या झाल्या आहेत, असे कॅट म्हणाले. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिरंग्याप्रती लोकांचे समर्पण आणि उत्साह लक्षात घेऊन 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2024 हा काळ 'स्वराज वर्ष' म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे.
भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितले की, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशातील व्यापारी संघटना कॅटच्या अंतर्गत 4000 पेक्षा जास्त तिरंगा कार्यक्रम आयोजित करतील. तिरंगा रॅली, तिरंगा मार्च, तिरंगा गौरव यात्रा, स्वराज मार्च असे कार्यक्रम होणार आहेत. या मोहिमेमुळे देशभरात 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. भरतिया म्हणतात की, हर घर तिरंगा अभियानापूर्वी ध्वजांची विक्री 150-200 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. (हेही वाचा: Independence Day 2023: PM मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाउंटचा DP; देशवासियांना केले 'हे' खास आवाहन)
लघु आणि मध्यम उत्पादन आणि व्यापार क्षेत्राने रात्रंदिवस परिश्रम करून भारतीय ध्वजांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. सामान्यतः बनवलेल्या ध्वजांच्या विविध आकारांमध्ये 6800×4200 मिमी, 3600 x 2400 मिमी, 1800 × 1200 मिमी, 1350 × 900 मिमी, 900 × 600 मिमी, 450 × 300 मिमी, 225 × 150 मिमी आणि 5 × 150 मिमी यांचा समावेश होतो.