Gujarat's 9 Years Old Girl Becomes Monk: गुजरातच्या प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची 9 वर्षांची मुलगी बनली साध्वी; सर्व भौतिक सुखांचा त्याग करून घेतली दीक्षा

देवांशीने जैनाचार्य कीर्तियसूरीश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. देवांशी दोन बहिणींमध्ये मोठी आहे. दीक्षापूर्वी एक दिवस देवांशीची उंट, हत्ती, घोडे यांच्यासह मोठ्या थाटामाटात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

देवांशी धनेश संघवी (संग्रहित संपादित प्रतिमा)

गुजरातमधील (Gujarat) एका 9 वर्षांच्या मुलीने कठोर निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. या मुलीने इतक्या लहान वयात साध्वी (Monk) बनण्याचा निर्णय घेतला. ही एका हिरे व्यापाऱ्याची मुलगी आहे. तिचे वडील देशातील सुप्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. मुलीच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती मात्र आता तिने सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. या हिरे व्यापाऱ्याच्या नऊ वर्षांच्या मुलीने भौतिक सुखसोयींचा त्याग करून जैन साधू म्हणून दीक्षा घेतली आहे. मुलीचे नाव देवांशी धनेश संघवी असे आहे.

हजारो लोकांच्या उपस्थितीत काल, बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून तिची दीक्षा सुरू झाली आहे. देवांशीने जैनाचार्य कीर्तियसूरीश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली. देवांशी दोन बहिणींमध्ये मोठी आहे. दीक्षापूर्वी एक दिवस देवांशीची उंट, हत्ती, घोडे यांच्यासह मोठ्या थाटामाटात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तिच्या कुटुंबाने यापूर्वी बेल्जियममध्ये अशीच मिरवणूक काढली होती. हा देश जैन समाजातील अनेक हिरे व्यापाऱ्यांचे घर आहे.

लहानपणापासून देवांशीने तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे अगदी साधे जीवन जगले आहे. देवांशीने कधीही टीव्ही किंवा चित्रपट पाहिलेला नाही. ती कधी रेस्टॉरंटमध्ये गेली नाही, तसेच तिने विवाहसोहळ्यांनाही कधी हजेरी लावली नाही. तिने आतापर्यंत 367 दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला आहे. देवांशीला पाच भाषा अवगत आहेत आणि तिने इतर जैन मुनींसोबत सुमारे 700 किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. (हेही वाचा: अल्पवयीन मुलाने आईवर झाडल्या गोळ्या; आपल्यावर प्रेम करत नसल्याच्या रागातून घडली घटना)

संघवी यांच्या एका कौटुंबिक मित्राने सांगितले की, या कुटुंबाचा मोठा व्यवसाय असूनही ते सर्वजण अगदी साधे जीवन जगात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवांशी ही धनेश संघवी आणि त्यांची पत्नी अमी यांची मोठी मुलगी आहे. त्यांचे कुटुंब संघवी अँड सन्स नावाची हिरे कंपनी चालवते, जी जगातील सर्वात जुन्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे. देवांशी मोठी झाल्यावर तिला वारसाहक्काने कोट्यावधी रुपयांचा हिऱ्यांचा व्यवसाय मिळाला असता. परंतु आता त्याऐवजी तिने बुधवारी सुरतमध्ये सर्व ऐषारामाचा त्याग करून संन्यास घेतला.