Gujarat Assembly Election 2022: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांना संपर्क, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दिशेने पाऊल, सूत्रांची माहिती
बैठकांवर बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे
पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवानंतर राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाने समीक्षा सुरु केली आहे. बैठकांवर बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यांनी काँग्रेसमधील सूत्रांच्या आधारे दिलेल्या या वृत्तात, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat,Gujarat Assembly Election 20220 रणनिती आणि मोहीम राबविण्याचा प्रस्ताव किशोर यांनी काँग्रेसला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे पाठिमागील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसने आपले काँग्रेसचा प्रचार सांभाळण्यासाठी किशोर यांच्या माजी सहकाऱ्यासोबत एक करार केला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेससाठी रणनिती तयार करण्यास सुरुवात केली.
सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, किशोर यांनी केवळ गुजरातसाठी एकवेळ काम करण्याची संधी द्यावी असा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसने अद्याप तरी प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मंगळवारी गुजरात काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीतही प्रशांत किशोर यांच्याबाबतचा प्रस्ताव पुढे आला होता. गुजरात काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रशांत किशोर यांना प्रचार मोहिमेत सहभागी करण्यास उत्सुकता दर्शवली. मात्र, अंतिम निर्णय राहुल गांधी यांनीच घ्यावा असेही या नेत्यांनी म्हटल्याचे समजते. मात्र, प्रशांत किशोर यांच्या जवळच्या व्यक्तींनी मात्र याचे खंडण केल्याचे समजते. (हेही वाचा, Prashant Kishor On Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोणा एका व्यक्तीचा दैवी हक्क नाही; प्रशांत किशोर यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा)
प्रियंका गांधीयांनी जानेवरी 2022 दरम्यान, बोलताना म्हटले होते की, प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता होती. मात्र, काही कारणांमुळे हा प्रवेश प्रत्यक्षात आला नाही. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशी गांधी कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, पुढे ही चर्चा हवेतच विरली.
दरम्यान, मधल्या काळात प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला उद्देशून म्हटले होते की, 'काँग्रेसचे नेतृत्व करणे हा कोणत्याही व्यक्तीचा दैवीय अधिकार नाही'. प्रामुख्याने जेव्हा एखादा नेता पाठीमागील 10 वर्षांपासून 90% पराभूत झाला आहे. प्रशांत किशोर यांनी असेही म्हटले होते की, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विरोधी पक्षामध्ये काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वामध्ये नाही.