Gujarat: कोरोनामुळे पतीचा मृ्त्यू; पत्नीसह दोन मुलांनी विषप्राशन करुन संपवले जीवन
पतीचं कोरोनामुळे निधन झाल्याने पत्नीने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे.
गुजरात (Gujarat) मधील द्वारका (Dwarka) शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पतीचं कोरोनामुळे निधन झाल्याने पत्नीने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. जयेशभाई जैन (60) असं कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून पत्नी साधनाबेन जैन (57) आणि मुलं कमलेश (35) व दुर्गेश (27) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. जैन कुटुंबियांचे नाश्त्याचे दुकान होते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता.
जयेशभाई जैन यांना काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यातच त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीसह दोन मुलांनी विषारी द्रव्ये प्राशन करुन आत्महत्या केली. वडीलांच्या अंत्यसंस्कारावरुन सकाळी 6 वाजता घरी परतल्यावर तिघांनीही विष प्राशन करुन आत्महत्या केली. दूधवाला दूध देण्यास आला त्यावेळी ही घटना उडघकीस आली. घराचा दरवाजा उघडा असून तिन्ही सदस्य जमिनीवर पडलेले दिसल्याने दूधवाल्याने घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
जैन कुटुंबिय मुळचे अमरेली जिल्ह्यातील असून द्वारका येथे ते भाड्याच्या घरात राहत होते. जयेशभाई यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिघांनीही टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (बेड मिळत नसल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास लावून आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना)
यापूर्वी कोरोनाच्या संसर्गात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. कोरोनामुळे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू सहन न झाल्याने अनेकांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. तर काहींनी आर्थिक विवंचना, कोरोनाची भीती यामुळे आत्महत्या केली आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढती रुग्णसंख्या, मृतांचा आकडा चिंताजनक असून कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.