Gujarat CM Bhupendra Patel Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात विजय रुपाणी सरकारमधील मंत्र्यांना डच्चू; 8 पटेल, 6 OBC यांच्यासह 24 मंत्र्यांनी घेतली शपथ
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळावर पूर्णपणे पटेलांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. आजच्या शपथविधीत 8 पटेलांसह 6 ओबीसी मंत्र्यांनी पद आणि गोफनियतेची शपथ घेतली.
विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे (Gujarat) नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांचे नाव मुख्यंत्री पदासाठी घोषीत झाले. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. त्यानंतर आज (गुरुवार, 16 ऑगस्ट 2021) भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उल्लेखनीय असे की विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच्या सर्व मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेला असून मंत्रिमंडळात (Gujarat CM Bhupendra Patel Cabinet) पूर्णपणे फेरबदल करण्यात आला आहे. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळावर पूर्णपणे पटेलांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. आजच्या शपथविधीत 8 पटेलांसह 6 ओबीसी मंत्र्यांनी पद आणि गोफनियतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवब्रत यांनी राजभवनात ही शपथ दिली.
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्वात पहिल्यांदा शपथ राजेंद्र त्रिवेदी यांनी घेतली. विजय रुपाणी सरकार वेळी ते विधानसभा अध्यक्ष होते. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ते मंत्री झाले आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्रिवेदी हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्र असणार आहेत. निमा आचार्य या विधानसभेच्या नव्या अध्यक्षा असतील.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री
राजेंद्र त्रिवेदी, जितेंद्र वघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णश मोदी, राघव पटेल, उदय सिंह चव्हाण, मोहनलाल देसाई, किरीट राणा, गणेश पटेल आणि प्रदीप परमार.
राज्यमंत्री
हर्ष सांघवी, जगदीश ईश्वर, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील, मुकेश पटेल, निमिषा बेन, अरविंद रैयाणी, कुबेर ढिंडोर, कीर्ति वाघेला, गजेंद्र सिंह परमार, राघव मकवाणा, विनोद मरोडिया आणि देवा भाई मालव.
गुजरातचा प्रादेशिक विचार करु पाहता सर्वाधिक मंत्री हे सौराष्ट्रातून आलेले दिसतात. सौराष्ट्रातून 8, दक्षिण गुजरातमधून 7, मध्य गुजरातमधून 6 आणि उत्तर गुजरातमधून 3 मंत्री येतात. (हेही वाचा, Political Journey Of Bhupendra Patel: भूपेंद्र पटेल आमदार म्हणून आले आणि पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले, जाणून घ्या असे कसे घडले?)
मंत्रीमंडळ शपथविधी वेळी 24 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व नवे चेहरे असून, विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची सुट्टी केली आहे. नव्या मंत्रिमंडळात 10 कॅबिनेट आणि 14 राज्यमंत्री असणार आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात पूर्णपणे पटेल समाजाचे वर्चस्व दिसत आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीची छापही या मंत्रिमंडळावर दिसते आहे. उल्लेखनिय इतकेच की दोन क्षत्रिय, दोन अनुसूचित जाती, तीन अनुसूचित माती आणि एक मंत्री जैन समाजातून निवडण्यात आला आहे.