Gujarat Assembly Election Results 2022: 'हाय वोल्टेज' लढती; गुजरातच्या सत्ताकारणावर परिणाम करणारे उमेदवार, मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष

पण, यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये एण्ट्री घेतली आहे. परिणामी गुजरातमध्ये तिरंगी लढत झाली आहे. इथे आपण पाहू शकता तिरंगी लढतीमध्येही काही 'हाय वोल्टेज' मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील उमेदवारांच्या जय-पराजयाच्या गुजरातच्या सत्ताकारणावर मोठा परिणाम होणार आहे.

AAP and BJP. (Photo credits: PTI)

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 (Gujarat Assembly Election Results 2022) साठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडत आहे. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर आज मतमोजणीचा बहुप्रतिक्षित दिवस उजाडला आहे. राज्यातील 182 विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या या निवडणुकीत 1,600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. नेहमीप्रमाणे गुजरातमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होते. पण, यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये एण्ट्री घेतली आहे. परिणामी गुजरातमध्ये तिरंगी लढत झाली आहे. इथे आपण पाहू शकता तिरंगी लढतीमध्येही काही 'हाय वोल्टेज' मतदारसंघ (High Voltage Candidates in Gujarat Election ) आहेत. या मतदारसंघातील उमेदवारांच्या जय-पराजयाच्या गुजरातच्या सत्ताकारणावर मोठा परिणाम होणार आहे. जाणून घ्या 'हाय वोल्टेज' लढती आणि प्रभावशाली उमेदवार.

घाटलोडिया मतदारसंघ-भूपेंद्र पटेल

भूपेंद्र पटेल यांची उमेदवारी गुजरातमध्ये अत्यंत लक्ष्यवेधी मानली जात आहे. ते अहमदाबाद मतदारसंघातील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पाठिमागील वर्षी विजय रुपानी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आल्याने पटेल यांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांसाठी ही एक प्रकारची लिटमस टेस्ट मानली जात आहे. विजय रुपानी यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्यावरुन विरोधकांनीही निशाणा साधला होता. (हेही वाचा, Gujarat, HP Election Results 2022 Live News Update:)

विरमगामम मतदारसंघ- हार्दिक पटेल

पाटीदार आंदोलन, काँग्रेस मार्गे भाजप असा प्रवेश केलेले हार्दिक पटेल यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. केवळ हार्दिक पटेलच नव्हे तर त्यांच्यावर डाव लावणाऱ्या भाजपसाठीही ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केला होता. काँग्रेस सोडताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेल गुजरातमधील एक उबरते नेतृत्व म्हणून उदयास आले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे लखा भारवाड (वर्तमान आमदार) आणि आम आदमी पार्टीचे (आप) अमरसिंह ठाकोर हे निवडणूक लढवत आहेत.

खंभालिया मतदारसंघ- इसुदान गढवी

इसुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. खंभालिया मतदारसंघातून ते रिंगणात आहेत. ते जिथून निवडणूक लढवत आहेत तो मतदारसंघ देवभूमी द्वारका जिल्ह्यात आहे. अरविंद केजरीवाल यांनीही म्हटले होते की, - इसुदान गढवी यांना “कृष्णाच्या भूमीतून” उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, एक्झिट पोलने AAP साठी 20 पेक्षा जास्त जागा नसल्याचा अंदाज वर्तवला होता. अरविंद केजरीवाल यांनी मात्र सांगितले की, त्यांचा पक्ष 100 पेक्षा जास्त जागा जिंकेल.

वडगाम मतदारसंघ- जिग्नेश मेवाणी

जिग्नेश मेवाणी हे गुजरातमधील एक चर्चित आमदार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वडगाममधून ते रिंगणात आहेत. जिग्नेश मेवाणी हे भाजपचे कडवे टीकाकार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार मणिभाई वाघेला रिंगणात आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत आहे.

कतारगाम मतदारसंघ- गोपाल इटालिया

गोपाल इटालिया हे गुजरात आपचे प्रमुख आहेत. ते कतारगाम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ सुरत जिल्ह्यात येतो. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दलच्या टिप्पणी केल्याचा आरोप होता. हा आरोप अरविंद केजरीवाल यांनी फेटाळून लावला. उल्लेखनीय असे की, कतारगाम ही सुरत शहरातील पाटीदार-बहुल जागा आहे, जी सध्या भाजपच्या ताब्यात आहे.

जामनगर उत्तर मतदारसंघ- रिवाबा एम

जामनगर उत्तर मतदारसंघातून क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा रिंगणात आहेत. रविंद्र जडेदा हे मूळचे जामनगरचे आहेत. त्यांच्या पत्नीला राजकीय पदार्पणातच भाजपने उमेदवारी दिली आहे. या जागेवरून विद्यमान आमदार धर्मेंद्रसिंह जडेजा यांना डावलून सत्ताधारी भाजपाने त्यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे भाजपने खेळलेला डाव किती यशस्वी होतो याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, गुजरातमधील प्रमुख दावेदारांमध्ये इतर प्रमुख नेत्यांमध्ये गुजरातचे माजी मंत्री परशोत्तम सोलंकी यांचा समावेश आहे जे भावनगर जिल्ह्यातील भावनगर ग्रामीणमधून निवडणूक लढवत आहेत. ते पाच वेळा आमदार आणि प्रमुख कोळी नेते आहेत. त्यांच्या चाहत्यांमध्ये ते ‘भाई’ म्हणून ओळखले जातात.