मोदी सरकारचे मोठे यश; भारताला मिळाली स्विस बँकेत असणाऱ्या खातेदारांची यादी, लवकरच समजणार कोणाकडे आहे Black Money
म्हणजेच पैसे लपवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्विस बँकेत उघडलेल्या भारतीय खात्यांची माहिती सरकारकडे सोपवली आहे
परदेशी भूमीतून काळ्या पैशाची (Black Money) माहिती मिळण्याच्या बाबतीत मोदी सरकारने (Modi Government) मोठे यश संपादन केले आहे. खातेदारांची माहिती गोपनीय ठेवण्याबाबत ज्या देशाचे नाव आघाडीवर होते, अशा स्वित्झर्लंड सरकारने (Switzerland) बँक खात्यांशी संबंधित माहिती भारत सरकारसमोर सादर केली आहे. म्हणजेच पैसे लपवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्विस बँकेत उघडलेल्या भारतीय खात्यांची माहिती सरकारकडे सोपवली आहे. ही माहिती मिळणार्या काही महत्वाच्या देशांपैकी भारत एक देश ठरला आहे. स्वित्झर्लंडच्या कर विभागाच्या माहितीनुसार, पुढील माहिती भारत सरकारकडे 2020 मध्ये सादर केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडमध्ये जगातील 75 देशांपैकी, जवळपास 31 लाख खाती आहेत जी रडारवर आहेत, त्यामध्ये भारताच्या अनेक खात्यांचा समावेश आहे. स्वित्झर्लंड संरकारकडून माहिती मिळाल्यानंतर, भारतीय सरकारने छाननी केल्यावर ही सर्व खाती बेकायदेशीर नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकारी एजन्सी आता या प्रकरणाची चौकशी सुरू करतील, ज्यामध्ये खातेदारांची नावे, त्यांची खाते माहिती सामायिक केली जाईल आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
परदेशात लपवून ठेवलेला काळा पैसा परत देशात घेऊन येणे हा मोदी सरकारसाठी एक मोठा मुद्दा बनला आहे. 2014 साली तसेच 2019 च्या निवडणुकीतही या मुद्द्याचा उल्लेख झाला होता. अशा प्रकारे काळ्या पैशांची माहिती गोळा करण्यासाठी भारतीय सरकार स्वित्झर्लंड सरकारसोबत सतत संपर्क साधत होते. काळ्या पैशाविरूद्धच्या या लढाईत आता मोदी सरकारला यश आले आहे.
यापूर्वी जून 2019 मध्ये स्विस नॅशनल बँकेच्या अहवालात, स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवी कमी झाल्या असल्याचे म्हटले होते. 2018 च्या आकडेवारीनुसार, भारतीयांचे केवळ 6757 कोटी रुपये स्विस बँकांमध्ये आहेत. मात्र यातील काळा पैसा किती आहेत याची माहिती नाही.