समुद्रात भारताचा नवा रक्षक अजित तैनात; सागरी सीमेवर भारताचा दबदबा, पाकिस्तानच्या गोटात घबराट!

तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्वदेशी बनावट यावर सातत्याने लक्ष केंद्रित करुन जीएसएलने भारताच्या सागरी क्षमता बळकट करण्याप्रतीची वचनबद्धता कायम राखली आहे आणि कंपनी देशाच्या नील अर्थव्यवस्थेमध्येही भरीव योगदान देत आहे.

समुद्रात भारताचा नवा रक्षक अजित तैनात; सागरी सीमेवर भारताचा दबदबा, पाकिस्तानच्या गोटात घबराट!

संरक्षण उत्पादन सार्वजनिक क्षेत्रतील अग्रगण्य कंपनी गोवा शिपयार्ड लिमिटेडने (जीएसएल) स्वदेशी बनावटीच्या जहाजबांधणीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कंपनीने आयसीजीएस अजित (यार्ड 1277) ही अत्याधुनिक वेगवान गस्ती नौका (एफपीव्ही) भारतीय तटरक्षक दलाकडे आज सुपूर्द केली. ही नौका सुपूर्द करण्याआधी झालेल्या प्रथम वाचन समारंभाला जीएसएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय, संचालक (कामकाज) निवृत्त रिअर ऍडमिरल नेल्सन डिसूझा एनएम आयएन(नि.), संचालक (वित्त) जहांगीर आलम अन्सारी, संचालक (सीपीपी अँड बीडी) नागेश दास पै, डीआयजी व्ही. के. परमार टीएम पीडी (एमएटी) आणि आयसीजीएस अजितचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट (जेजी) मनिष तालन यांच्यासह भारतीय तटरक्षक दल व जीएसएमचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयसीजीएस अजित मध्ये 65 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी घटक वापरण्यात आले असून यातून भारताच्या देशांतर्गत जहाजबांधणी उद्योगाचे आणि सरकारच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे सामर्थ्य प्रतिबिंबित होते.

या 51.43 मीटर लांब व 8 मीटर रुंद नौकेची विस्थापन क्षमता 2.5 मीटर ड्राफ्टसाठी 330 टन इतकी आहे. यामध्ये नियंत्रित पिच प्रोपेलर्स (सीपीपी) असलेली दोन समुद्री डिझेल इंजिन्स आहेत. वेगवान गस्ती नौकांमधील हे अनोखे वैशिष्ट्य असून यामुळे वेग व कार्यक्षमता दोन्हींमध्ये सुधारणा झाली आहे.

सर्वाधिक 27 नॉटपेक्षा अधिक वेग आणि 1500 समुद्री मैलांची क्षमता असलेल्या या नौकेमध्ये सुसज्जता, कार्यक्षमता व शाश्वतता वाढविण्यासाठी आधुनिक यंत्र नियंत्रण प्रणाली बसवण्यात आली आहे.

आयसीडीएस अजितवरील कर्मचाऱ्यांमध्ये 6 अधिकारी आणि 35 खलाशांचा समावेश आहे. अनेक महत्त्वपूर्ण सागरी सुरक्षा मोहीमा हाती घेण्याच्या दृष्टीने या नौकेची रचना करण्यात आली आहे. यामध्ये मच्छिमारांची सुरक्षा, विशेष आर्थिक क्षेत्र (इइझेड) देखरेख, किनारपट्टीवरील गस्त, तस्करीविरोधी कारवाई आणि लुटारुंविरुद्धची कारवाई यासह शोध आणि बचाव मोहिमांचा समावेश आहे.

आयसीजीएस अजित गस्त नौकांच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे भारतीय तटरक्षक दलाची भारताची किनारपट्टी, समुद्री सीमा सुरक्षित राखण्याची क्षमता वाढेल आणि देशाच्या सागरी सुरक्षा रचनेलाही बळ मिळेल.

या नौकेच्या भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट होण्यातून गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीची भारताच्या संरक्षण दलांना आधुनिक, उच्च कार्यक्षमता असलेल्या नौका पुरवण्याबाबतची वचनबद्धता अधोरेखित होते. स्वदेशी जहाजबांधणी, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना आणि मेक इन इंडिया अभियानांतर्गत भारताला जहाजबांधणीचे जागतिक केंद्र बनवणे यामधील जीएसएलची भूमिका याद्वारे पुनर्प्रस्थापित झाली आहे.

तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्वदेशी बनावट यावर सातत्याने लक्ष केंद्रित करुन जीएसएलने भारताच्या सागरी क्षमता बळकट करण्याप्रतीची वचनबद्धता कायम राखली आहे आणि कंपनी देशाच्या नील अर्थव्यवस्थेमध्येही भरीव योगदान देत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2026 07:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).