Minor Girl Kidnapped: वसतीगृहातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, गोवा पोलिसांकडून आरोपीस मुंबई येथून अटक

त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने मुलींच्या वसतिगृहातून पीडितेचे अपहरण (Goa Minor Girl Kidnapping) केले असा संशय आहे.

Goa Police | | (Photo Credit: ANI)

गोवा पोलिसांनी (Goa Police) एका 21 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने मुलींच्या वसतिगृहातून पीडितेचे अपहरण (Goa Minor Girl Kidnapping) केले असा संशय आहे. आरोपी मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) येथील असून अक्षय मनोहर तायडे असे त्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती चौकशीदरम्यान पुढे आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोवा पोलिसांनी आरोपीला मुंबई (Mumbai) येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (9 जानेवारी) रोजी अटक केली.

वसतिगृह अधिकक्षकांकडून पोलीसांत तक्रार

गोव्यातील म्हापसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जिवाबा दळवी यांनी म्हटले की, मुलीच्या वसतिगृहाच्या वॉर्डन यांनी रविवारी (7 जानेवारी 2024) दिलेल्या तक्रारीत दावा केला की, त्यांच्या वसतिगृहातून एक 14 वर्षीय मुलगी खरेदीचे निमित्त करुन सायंकाळच्या सुमारास बाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती वसतिगृहात परतलीच नाही. म्हापसा पोलिसांनी वॉर्डनच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहिता कलम 363 आणि गोवा चिल्ड्रन अॅक्ट कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा, गोवा: खोर्ली-म्हापसा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या)

मुंबई पोलिसांकडून मानवी आणि तंत्रज्ञाद्वारे तपास

एसडीपीओ जिवाबा दळवी यांनी दिलेल्या सूचनेवरुन पोलीस निरीक्षक श्रीकांत नायक यांनी मुलीच्या शोधार्थ पथके तयार केली आणि तपास सुरु केला. या प्रकणात गुप्त माहिती जमवत असतानाच एक व्यक्ती बेपत्ता असलेल्या मुलीसोबत संशयास्पदरित्या फिरताना आढळला. गोवा पोलिसांनी तातडीने त्यांचे समकक्ष असलेल्या मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई येथील नवपाडा पोलिसांना गोवा पोलिसांकडून प्राप्त माहितीवरुन पोलीस मानवी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले. त्याला मुंबईतून अटक केली आणि त्याला म्हापसा येथे आणले.

आरोपीला पोलीस कोठडी

पोलिसांनी आरोपीला अटक करुन गोव्याला आणिले. त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपीकडे चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौकशीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्याता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

एखाद्या गुन्हेगारी कारवाईतून किंवा आर्थिक अथवा तत्सम फायदा डोळ्यासमोर ठेऊन एखाद्या व्यक्तीस त्याच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने किंवा फूस लावून पळवून घेऊन जाणे याला अपहरण असे मानले जाते. अशा प्रकरणात फसवून पळवून नेणे, जबरदस्तीने पीडित व्यक्तीस घेऊन जाणे, डांबून ठेवणे, त्याच्या सुटकेसाठी खंडणी मागणे, अथवा इतर काही गुन्हेगारी कृत्य करणे हे सर्व अपहरण कक्षेत मोडते. खास करुन अशा घटना, एकतर्फी प्रेम, खंडणी, स्थावर किंवा जंगम मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, वैर, शत्रूत्वाची भावना अशा कारणांतून घडतात, असे विविध घटनांच्या तपासातून पुढे आले आहे.