Goa News: विमानातील मैत्रीतून महिलेवर बलात्कार, गोवा पोलिसांकडून गुजरातमधील व्यक्तीस अटक
सदर इसम आणि पीडित महिला यांची विमानात ओळख झाली. त्यानंतर विमान लँड झाल्यानंतर त्याने महिलेला रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Goa Police: विमान हवेत असताना झालेल्या मैत्रिचा फायदा घेत एका इसमाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सदर इसम आणि पीडित महिला यांची विमानात ओळख झाली. त्यानंतर विमान लँड झाल्यानंतर त्याने महिलेला रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना उत्तर गोवा (North Goa) येथील असोनोरा गावातील रिसॉर्टवर घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गोवा पोलिसांनी (Goa Police) गुजरातमधील एका इसमास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली. पीडिता ही पर्यटक आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक केली आहे. ज्याचे नाव लक्ष्मण शियार असून तो 47 वर्षांचा आहे. तोसुद्धा गोव्याला पर्यटक म्हणूनच आला होता.
पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी यांनी एकाच विमानाने प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. संभाषणादरम्यान आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला. नंतर तो गोव्यात पोहोचल्यावर तो तिच्या संपर्कात राहिला. त्यानंतर त्याने एका रिसॉर्टवर तिच्यावर बलात्कार केला असा आरोप आहे.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी हे एकाच विमानाने गोव्याला आले असले तरी ते स्वतंत्रपणे प्रवास करत होते. त्यांनी एकाच विमानाने ठरवून प्रवास केला नव्हता. मात्र, विमानातील मैत्रिचा फायदा घेत आरोपीने पीडितेला 23 ऑगस्ट रोजी संपर्क केला. तसेच, रिसॉर्टमध्ये असलेल्या सेवा-सुविधांची माहिती देण्याचा बहाणा करुन त्याने तिला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच, घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता न करण्याची धमकीही दिली.
घटना घडल्यानंतर महिलेने तातडीने पोलीसात तक्रार दिली. पोलिसांनी पथके तयार करत उत्तर गोव्यातील मापुसा शहराजवळी थिविम गावात आरोपीला अटक केली. घटना घडलले गाव पणजी शहरापासून 40 किमी अंतरावर आहे.