Goa Lockdown Guidelines: गोवा मध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा; पहा काय खुले असेल पर्यटकांसाठी कशावर बंदी?
गोव्यामध्ये 29 एप्रिल ला संध्याकाळी 7 वाजल्यापासून 3 मे च्या सकाळ पर्यंत 5 दिवसांचा लॉकडाऊन आहे.
भारतामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता कोरोनाची साळखी तोडण्यासाठी प्रत्येक राज्या-राज्यात प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून राज्यांनी विचार करावा असे आवाहन केले होते. मात्र गोव्यातील वाढती रूग्णसंख्या पाहता त्यांनी देखील 5 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती देताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान या लॉकडाऊन मध्ये गोव्यात नेमकं काय सुरू असेल आणि काय बंद? हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर खालील माहिती नीट वाचा.
गोव्यामध्ये 29 एप्रिल ला संध्याकाळी 7 वाजल्यापासून 3 मे च्या सकाळ पर्यंत 5 दिवसांचा लॉकडाऊन आहे त्यामुळे या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणारी अनावश्यक गर्दी आणि त्यामधून पसरणारा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोव्यामध्ये काय बंद असेल काय सुरू असेल?
- गोव्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात लसीकरण पूर्ण क्षमतेने सुरू असणार आहे.
- आठवडी बाजार बंद असेल पण अत्यावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला दुकानं सुरू ठेवली जातील.
- गोव्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहार सुरू ठेवले जाणार आहेत.
- गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील.
- पर्यटकांचं आकर्षण असणारे कसिनो, पब, रेस्टॉरंट लॉकडाऊन मध्ये बंद राहणार आहेत.
- लॉकडाऊन मध्ये हॉटेल्स बंद असले तरीही किचन सुरू राहणार आहे आणि नागरिकांसाठी होम डिलेव्हरीची सेवा सुरू ठेवली जाणार आहे.
- सध्या गोव्यामध्ये असलेल्या पर्यटकांना हॉटेलबाहेर पडण्यापासून मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान गोव्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणं जाणवत असतील त्यांनी तात्काळ उपचार सुरू करावेत असे आवाहन देखील प्रमोद सावंत यांनी केले आहे. यासाठी आरटीपीसीआर टेस्टच्या निकालाची वाट पाहत बसण्याची गरज नसल्याचं देखील सांगण्यात आले आहे.