Foxconn to Invest in India: फॉक्सकॉन भारतात करणार 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक; 25,000 लोकांना मिळणार नोकऱ्या

हा प्लांट तेलंगणातील फॉक्सकॉन इंटरकनेक्ट टेक्नॉलॉजीच्या ऑपरेशनसाठी एक हब म्हणूनही काम करेल.

Foxconn (Photo Credits: Twitter)

भारतामधील तेलंगणामध्ये राज्यात Apple Inc चे अधिकृत भागीदार फॉक्सकॉन (Foxconn) टेक्नॉलॉजी ग्रुप स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी नवीन प्लांट स्थापन करणार आहे. यासाठी कंपनी $500 दशलक्ष (सुमारे 41.14 कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. सोमवारी (15 मे), तेलंगणाचे नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास मंत्री केटी रामा राव यांनी ट्विट केले की, 'तेलंगणातील फॉक्सकॉनच्या पहिल्या प्लांटच्या पायाभरणी समारंभाबद्दल माहिती देताना मला अतिशय आनंद होत आहे. फॉक्सकॉनच्या या करारामुळे राज्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 25 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.’

कंपनीने तेलंगणा सरकारसोबत संयुक्त निवेदन जारी करून नवीन प्लांटद्वारे 'जागतिक दर्जाची उत्पादने' वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे. हा प्लांट तेलंगणातील फॉक्सकॉन इंटरकनेक्ट टेक्नॉलॉजीच्या ऑपरेशनसाठी एक हब म्हणूनही काम करेल. यामुळे भारतातील विद्यमान उत्पादन क्षमताही वाढेल. या महिन्याच्या 8 तारखेला, फॉक्सकॉन समूहाने बेंगळुरू विमानतळाजवळील देवनहल्ली परिसरात 13 दशलक्ष चौरस फूट (1.2 दशलक्ष चौरस मीटर) जमीन खरेदी केली. वृत्तानुसार, फॉक्सकॉनची उपकंपनी Hon High Technology India Mega Development Pvt Ltd ने याबाबत लंडन स्टॉक एक्सचेंज (LSE) ला माहिती दिली होती.

कंपनीने ही जमीन बेंगळुरूमध्ये 37 मिलियन डॉलर म्हणजेच 303 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप या जमिनीवर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे अॅपलचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट चीनमधून भारतात हलवले जात आहे. भू-राजकीय तणाव आणि कोरोना महामारीनंतर अॅपलसह इतर अमेरिकन टेक दिग्गज चीनच्या बाहेर त्यांच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यावर काम करत आहेत. (हेही वाचा: Charpai Sold Rs 1 Lakh: अमेरिकन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 1 लाखांहून अधिक रुपयांना विकण्यात आली बाज)

अॅपलने 2017 मध्ये आयफोन्स एसई (iPhone SE) सह भारतात आयफोन्स बनवायला सुरुवात केली. यात तीन इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) भागीदार आहेत- फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन. iPhone SE नंतर, iPhone 11, iPhone 12 आणि iPhone 13 चे उत्पादनही भारतात झाले. फॉक्सकॉनचा प्लांट चेन्नईजवळील श्रीपेरंबदुर येथे आहे.