Fortune Global 500 List: मुकेश अंबानींच्या Reliance चा नवा विक्रम; फॉर्च्यून ग्लोबल 500 च्या यादीत मिळाले 88 वे स्थान
फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीतील कंपन्यांची निवड मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातील त्यांच्या एकूण कमाईच्या आधारे केली जाते.
अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries Ltd) नवा विक्रम रचला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत (Fortune Global 500) पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज आता 88 व्या स्थानावर आली आहे आणि 16 स्थानांची झेप कंपनीने ही कामगिरी केली आहे. याआधी 2022मध्ये रिलायन्स फॉर्च्यून ग्लोबल 500 च्या यादीत 104 व्या क्रमांकावर होती आणि आता 2023 च्या क्रमवारीत 88 व्या स्थानावर पोहोचली आहे.
यावर्षी 8 भारतीय कंपन्यांनी फॉर्च्यून ग्लोबल 500 रँकिंगमध्ये स्थान मिळवले आहे आणि या अंतर्गत, सरकारी तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने देखील पहिल्या 100 मध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने 94 वे स्थान पटकावले आहे. आयओसीने 48 स्थानांची झेप घेऊन सध्याचे हे स्थान प्राप्त केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या दोन वर्षांत फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 67 स्थानांची प्रगती केली आहे. 2021 मध्ये या यादीत ते 155 व्या स्थानावर होते. रिलायन्स इंडस्ट्रीज हे फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत भारतीय कंपन्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने या फॉर्च्युन ग्लोबल लिस्टमध्ये सलग 20 वर्षे आपले स्थान कायम ठेवले आहे. या यादीत भारतातील कोणत्याही खाजगी क्षेत्रातील कंपनीचा हा सर्वात जास्त काळ मुक्काम आहे.
या यादीत भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ला मात्र यावर्षी तोटा सहन करावा लागला आहे. फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत कंपनी 9 स्थानांनी घसरून 107 व्या क्रमांकावर आली आहे. दुसरीकडे, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) या यादीत 158 व्या स्थानावर आहे. या यादीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे रँकिंग 233 व्या स्थानावर आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत 235 व्या स्थानावर आहे. (हेही वाचा: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध - PM Narendra Modi)
या यादीत टाटा मोटर्स आणि राजेश एक्सपोर्ट या दोन अन्य भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. टाटा मोटर्सने 33 स्थानांनी सुधारणा करत 337 व्या स्थानावर, तर राजेश एक्सपोर्ट्सने 84 स्थानांनी झेप घेत 353 व्या क्रमांक प्राप्त केला आहे. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीतील कंपन्यांची निवड मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षातील त्यांच्या एकूण कमाईच्या आधारे केली जाते. वॉलमार्ट फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत 1 व्या स्थानावर आहे, त्यानंतर सौदी अरामको, स्टेट ग्रिड, ऍमेझॉन आणि चायना नॅशनल पेट्रोलियम यांचा क्रमांक लागतो. सिनोपेक ग्रुप, एक्सॉन मोबिल, ऍपल, शेल आणि युनायटेडहेल्थ ग्रुप या टॉप 10 मधील इतर कंपन्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2023 07:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

