Farmers’ Protests: संयुक्त किसान मोर्चाची घोषणा- 18 फेब्रुवारी रोजी देशभरात राबवली जाणार Rail Roko मोहीम, जाणून घ्या वेळ
या शेतकऱ्यांची मागणी आहे की केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत. 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी ट्रॅक्टर रॅली काढली होती
शेतकरी संघटनांनी तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी चळवळीचे नेतृत्व करणारे संयुक्त किसान मोर्चा (Samyukta Kisan Morcha) यांनी आज जाहीर केले की, 18 फेब्रुवारी रोजी देशभरात ‘रेल रोको’ (Rail Roko) मोहीम राबवण्यात येईल. देशभरात शेतकरी ट्रॅक्टर रॅली व चक्का जामनंतर आता संयुक्त मोर्चाने 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत रेल रोको मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारसमोर मोठ्या अडचणी उभा राहू शकतात.
या व्यतिरिक्त संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. 12 फेब्रुवारीपासून राजस्थानच्या सर्व रस्त्यांवर टोल प्लाझा टोल फ्री करण्यात येणार आहेत. याशिवाय 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून, देशभरात मेणबत्ती मोर्चा आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातील. यासह संयुक्त मोर्चाने 16 फेब्रुवारी रोजी सर छोटू राम यांच्या जयंतीनिमित्त देशभरात शेतकरी एकता दर्शविण्याचा निर्णय घेतला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत शेतकरी आंदोलनाला पवित्र असल्याचे सांगत म्हटले की, याला आंदोलनकर्त्यांनी अपवित्र केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, संसद आणि सरकार शेतकर्यांचा खूप आदर करते आणि हे तीनही कृषी कायदे कुणालाही 'बंधनकारक नाहीत तर पर्यायी' आहेत. त्यामुळेच याचा निषेध करण्याचे कारण नाही. (हेही वाचा: PM Narendra Modi on Sharad Pawar: शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत- नरेंद्र मोदी)
दरम्यान, सुमारे 80 दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सिंघु, गाजीपुर आणि टीकरी सीमांवर तळ ठोकून आहेत. या शेतकऱ्यांची मागणी आहे की केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत. 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी दिल्लीमध्ये बर्याच ठिकाणी हिंसाचार झाला. यानंतर 6 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांनी तीन तास चक्का जामची घोषणा केली होती.