Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर UN Human Rights चे ट्विट, म्हटले 'अधिकाधिक संयम बाळगावा'
यामुळे सध्या देशातील राजकारण तापले आहे. दरम्यान, शुक्रवारी यूएन मानवाधिकार (UN Human Rights) नेही शेतकरी आंदोलनावर एक ट्विट केले
भारतामध्ये गेले दोन महिने शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers protest) सुरु आहे. 26 जानेवारीला यामुळे राजधानी दिल्लीत हिंसाचारही उफाळला होता. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकर्यांच्या निषेधाचे समर्थन केले. पॉप स्टार रिहाना ते पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर ट्वीट केले. यामुळे सध्या देशातील राजकारण तापले आहे. दरम्यान, शुक्रवारी यूएन मानवाधिकार (UN Human Rights) नेही शेतकरी आंदोलनावर एक ट्विट केले, आपल्या ट्वीटमध्ये युएन मानवाधिकार आयोगाने अधिकाधिक संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्सने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही भारतातील अधिकारी आणि निदर्शकांना सध्या सुरू असलेल्या शेतकरी निषेधामध्ये अधिकाधिक संयम बाळगण्याचे आवाहन करतो. शांततापूर्ण असेंब्ली आणि अभिव्यक्ति हक्कांचे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही संरक्षण केले जावे. सर्वांसाठी मानवाधिकारांबद्दल योग्य तेच न्याय्य समाधान शोधणे अत्यंत आवश्यक आहे.’
विशेष म्हणजे दोन महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीची आता आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दाखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन पॉप स्टार रिहानाने यासाठी आपले समर्थन व्यक्त केले. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी सातत्याने शेतकरी चळवळीबाबत आपले मत व्यक्त करत आहेत. रिहानाच्या ट्विटनंतर ग्रेटा थनबर्गनेही भारतात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीबद्दल ट्विट करत आपला यासाठी पाठींबा असल्याचे सांगितले. तिने लिहिले होते की, ‘आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी चळवळीशी एकजूट आहोत.’ (हेही वाचा: Republic Day Violence: Greta Thunberg ने शेअर केलेल्या Toolkit बाबतचा वाद शिगेला; टूलकिटच्या लेखकाच्या माहितीसाठी दिल्ली पोलीस करणार Google कडे विचारणा)
याला नुकतेच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्यात अडथळा आणू शकत नाही! असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवरुन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने यासंदर्भात म्हटले आहे की, असे हॅशटॅग आणि टिप्पण्यां योग्य किंवा जबाबदार नाहीत. अशा टिप्पण्या करण्यापूर्वी सत्य जाणून घेतले पाहिजे आणि मुद्दे योग्यरित्या समजून घेतले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलेब्जनी केलेले हे ट्वीट्स म्हणजे भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असेही काही नेत्यांनी म्हटले आहे.