Farmers Protest: 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांनी सरकारला दिला अल्टीमेटम
आमची अराजकीय चळवळ देशभरात होईल
2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने तीनही कृषी कायदे मागे न घेतल्यास आपण पुढील रणनीतींवर काम करण्यास सुरूवात करू, असे भारतीय शेतकरी संघटनेचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ देत आहोत. त्यानंतर आपण पुढची योजना आखू. दबावाखाली आम्ही सरकारशी बोलणार नाही.' यासह ते म्हणाले की, जर सरकारने कृषी कायदे मागे घेतले नाहित आणि किमान आधारभूत किंमतीबाबत कायदे केले नाहीत तर आंदोलन सुरूच राहिल. आम्ही देशभर प्रवास करू आणि देशभर आंदोलन केले जाईल.
शनिवारी चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना संबोधित करताना टिकैत म्हणाले की, कोणत्याही दबावाखाली आम्ही सरकारशी बोलणी करणार नाही, व्यासपीठ बरोबरीचे होईल तेव्हाच चर्चा होईल. आम्ही हे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही पुढे काय करायचे ते ठरवू. एकतर सरकार आमचे म्हणणे ऐकेल, अन्यथा पुढील चळवळ अशी होईल की, ज्यांचा मुलगा सैन्य-पोलिसात असेल, त्याचे कुटुंब येथे असेल. त्याचे वडील आपल्या मुलाचा फोटो घेऊन इथे बसतील.’
टिकैत पुढे म्हणाले, ‘एकतर सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, एमएमएसपीबाबत कायदा करावा, अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशात प्रवास करू. आमची अराजकीय चळवळ देशभरात होईल.’ ते असेही म्हणाले, की आम्ही वाटाघाटी करण्यास तयार आहोत, पण विना अट बोलणी व्हावी.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी त्यांच्या आंदोलनस्थळांच्या जवळपासच्या भागात इंटरनेट निर्बंध, अधिकाऱ्यांकडून होणारा छळ आणि इतर बाबींबाबत आज, 6 फेब्रुवारी रोजी देशव्यापी 'चक्का जाम' जाहीर केला होता. या 'चक्का जाम'ला पाठिंबा दर्शविल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शनिवारी मध्य दिल्लीच्या शहीदी पार्कजवळ 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा: Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर UN Human Rights चे ट्विट, म्हटले 'अधिकाधिक संयम बाळगावा')
दरम्यान, याआधी राकेश टिकैत यांनी आंदोलन लांबण्यासाठी एक सूत्र दिले होते जेणेकरून ते अधिकाधिक दिवस खेचले जाऊ शकेल. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकर्यांना प्रत्येक गावातून ट्रॅक्टर, 15 जण आणि 10 दिवसांच्या फॉर्म्युलावर काम करण्यास सांगितले होते, त्यामुळे आंदोलन 70 वर्षे टिकले तरी काही हरकत नाही, असे ते म्हणाले होते.