Fake News: न्यूज वेबसाईटवर 'खोटी बातमी' प्रसारित करून स्थलांतरित कामगारांमध्ये भीतीची भावना निर्माण केल्याचा आरोप; पोलिसांनी सीईओ आणि मुख्य संपादकावर दाखल केला गुन्हा- Reports
ही बातमी खोटी आहे.
खोट्या बातम्या (Fake News) प्रकाशित करून राज्यातील स्थलांतरित कामगारांमध्ये भीती पसरवल्याबद्दल तमिळनाडू पोलिसांनी एका न्यूज वेबसाईट विरोधात गुन्हा दाखल केला आहे. थिरुनिनरावूर पोलिसांनी आयपीसी कलम 153(a) (विविध प्रादेशिक/भाषा/जाती गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे), 505 (समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने अफवा प्रकाशित करणे आणि प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी सांगितले की, या हिंदी भाषेतील न्यूज वेबसाइट्सने आपल्या एका लेखात म्हटले आहे की, स्थलांतरित कामगारांनी आरोप केला आहे की, तामिळनाडूमध्ये ‘तालिबानी’ शैलीतील हल्ल्यांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत थिरुनिनरावूर येथील डीएमके आयटी शाखेचे सदस्य सूर्यप्रकाश यांनी थिरुनिनरावूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारे वेबसाइट्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सूर्य प्रकाश म्हणाले की ही वेबसाइट खोट्या बातम्या पसरवत आहे आणि तामिळनाडूमधील इतर राज्यातील कामगारांमध्ये भीतीची भावना निर्माण करत आहे. यामुळे स्थानिक लोक आणि इतर राज्यातील लोकांमध्ये संघर्षाचा धोका आहे.’
न्यूज वेबसाईटने दिलेली माहिती ट्विटरसह विविध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली गेली आहे, ज्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीत पुढे, या वेबसाईटचे सीईओ राहुल रोशन आणि संपादक नुपूर शर्मा यांच्यावर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल आणि लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याबद्दल पोलीस कारवाईची मागणी केली आहे. (हेही वाचा: मोबाईल फोनसोबत विकल्या जाणाऱ्या चार्जरवर वेगळा कर आकारला जाऊ शकत नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्वाळा)
दरम्यान, आज चेन्नईमध्ये बिहारच्या ग्रामीण विकास विभागाचे सचिव बालमुरुगन यांनी सांगितले की, ‘बिहारी मजुरांवर हल्ला झाल्याचे संदेश देणारे काही व्हिडिओ व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाले होते. ही बातमी खोटी आहे. याची पुष्टी केली असून, असे काहीही घडले नसल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओमुळे थोडी घबराट निर्माण झाली होती, परंतु हे मेसेज बनावट असल्याचे तामिळनाडू पोलीस आणि इतर स्रोतांनी स्पष्ट केले आहे. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे.’