Fake Currency Notes: ऐकावे ते नवलंच! अहमदाबादमध्ये सोने व्यावसायिकाची 1.30 कोटींची फसवणूक; नोटांवर महात्मा गांधींऐवजी छापला Anupam Kher चा फोटो
या नोटांवर अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो होता. त्यानंतर त्यांनी या गुंडांचा ठिकठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला नाही.
गुजरातमधून बनावट नोटासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका ज्वेलरी व्यावसायिकाची किरकोळ नव्हे तर 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. भामट्यांनी खोट्या नोटा देऊन ही फसवणूक केली. बनावट नोटांवर गांधीबापूंच्या चित्राऐवजी अनुपम यांचे चित्र छापण्यात आले होते. माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी या ज्वेलर्सच्या व्यवस्थापकासोबत 2100 ग्रॅम सोन्याचा सौदा केला. हा सौदा 1.60 कोटी रुपयांना झाला होता. या करारांतर्गत फसवणूक करणाऱ्यांनी व्यावसायिकाला 1 कोटी 30 लाख रुपये दिले व सोने घेऊन ते निघून गेले. जेव्हा या नोटा तपासल्या गेल्या तेव्हा त्यांच्यावर अनुपम खेर यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले.
या व्यावसायिकाच्या तक्रारीच्या आधारे अहमदाबाद शहर पोलिसांनी आता अज्ञात लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मेहुल ठक्करने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत सांगितले की, तो अहमदाबादच्या मानेक चौक परिसरात सराफा फर्म चालवतो. काही लोकांना 2,100 किलो सोने खरेदी करायचे असल्याचे त्याला समजले. तो या लोकांच्या संपर्कात आला. दोघांमध्ये करार झाला. त्यानुसार ठक्कर यांच्या कर्मचाऱ्यांनी भामट्यांना सोने दिले आणि त्या बदल्यात आरोपींनी त्यांना प्लास्टिकच्या कव्हरमध्ये रोख रक्कमही दिली.
प्लास्टिकच्या पिशवीत 1.3 कोटी रुपये रोख असल्याचे सांगण्यात आले. बाकीचे 30 लाख रुपये थोड्या वेळाने देतो व आता दिलेली रक्कम मोजणी यंत्राद्वारे मोजण्यास सांगून आरोपी तेथून निघून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी दुकानातून सोने घेऊन पळून गेले. ठक्कर यांच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे कव्हर उघडले असता त्यांना त्यात बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांवर अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो होता. त्यानंतर त्यांनी या गुंडांचा ठिकठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. (हेही वाचा: Mumbai Crime: रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल)
इन्स्पेक्टर ए ए देसाई यांनी मीडिया हाऊसशी बोलताना सांगितले की, आरोपींनी अतिशय हुशारीने फसवणूक करण्याचा कट रचला. त्यानीन सीजी रोडवर अंगडिया फर्मच्या नावाने बनावट कार्यालय उघडून सोने व्यावसायिकाची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. फसवणूक करणारी टोळी राजस्थानची असावी, असा संशय पोलिसांना आहे. या बनावट नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिझोल बँक ऑफ इंडिया असे लिहिले आहे.