Edible Oil Prices: सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किमतींमध्ये प्रति लिटर 30 रुपयांची घट, जाणून घ्या नवीन दर
खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने 6 जुलै रोजी एक बैठक बोलावली होती, ज्यामध्ये सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या (Edible Oil) दरात प्रतिलिटर 30 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या (DFPD) आकडेवारीनुसार, या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात खाद्यतेल 30 रुपयांनी स्वस्त होईल. तसेच, सरकार आणखी काही खाद्यतेलांवरील शुल्क कमी करू शकते, त्यासाठी उद्योगांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. अनेक कंपन्यांनी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून एक लिटरच्या बाटल्या आणि सॅशेच्या एमआरपीमध्ये 30 रुपयांची कपात केली आहे. किमती कमी होण्यामागे जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घट हे कारण आहे.
अदानी विल्मारने (Adani Wilmar) सोमवारी खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. कंपनी फॉर्च्युन (Fortune) ब्रँड अंतर्गत उत्पादने विकते. सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. नवीन किमतीसह माल लवकरच बाजारात येईल. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती.
खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने 6 जुलै रोजी एक बैठक बोलावली होती, ज्यामध्ये सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते. अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अंगशु मलिक म्हणाले, ‘महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना दिलासा मिळेल कारण नवीन किमतीसह नवीन स्टॉक लवकरच बाजारात पोहोचेल.’
अदानी विल्मरच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन तेलात सर्वाधिक कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत 195 रुपये प्रति लीटरवरून 165 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे, तर सर्वात कमी कपात मोहरीच्या तेलात करण्यात आली आहे, ज्याची किंमत 195 रुपयांवरून 190 रुपये प्रती लिटर करण्यात आली आहे. (हेही वाचा: GST: काही पदार्थांना जीएसटीमधून सवलत, पाहा यादी)
सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लिटर, तर फॉर्च्युन राईस ब्रॅन (राईस ब्रॅन) तेलाची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शेंगदाणा तेलाची किंमत 220 रुपये प्रति लिटरवरून 210 रुपये झाली आहे. रागा ब्रँड अंतर्गत वनस्पतीची किंमत 200 रुपये प्रति लिटरवरून 185 रुपये प्रति लिटर आणि रागा पामोलिन तेलाची किंमत 170 रुपये प्रति लिटरवरून 144 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे.