Delhi schools Bomb Threat: दिल्लीती अनेक शाळांना बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
पोलिस तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु सुरक्षिततेबद्दल चिंता कायम आहे.
राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्ली येथील 30 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोट (Delhi Schools Bomb Threat) घडविण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. हा प्रकार सलग दुसऱ्या दिवशीही घडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. दिल्लीतील अनेक शाळांना शनिवारी (14 डिसेंबर) अशाच प्रकारच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाले. घटनेच्या पुनरावृत्तीत "आज पुन्हा दिल्लीच्या शाळांमध्ये डीपीएस आरके पुरम, रायन इंटरनॅशनल स्कूल, वसंत कुंज यांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला," असे दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6.12 वाजता शाळांना एक ग्रुप मेल आला.
दिल्ली पोलीस अधिक माहिती देताना म्हणाले, आरके पुरम येथील रायन इंटरनॅशनल स्कूल, वसंत कुंज यांना सकाळी 6:12 वाजता childrenofallah@outlook.com या अकाउंटवरून बॉम्ब धमकीचा ईमेल आला होता. हा ईमेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने स्वत:ची ओळख 'बॅरी अल्लाह' अशी करुन दिली आणि शाळेच्या इमारती स्फोट घडवून उडवून देण्याचा धमकीवजा इशारा दिला. (हेही वाचा, Delhi School Bomb Threat: दिल्ली पोलिसांकडून डीपीएस आरके पुरम आणि इतर शाळांमध्ये तपासणी; ईमेलद्वारे मिळाली होती बॉम्बने उडवण्याची धमकी (Watch Video))
धमकीचा तपशील आणि पोलिस कारवाई
पोलिसांनी सांगितले की, शाळांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमधील भाषा अत्यंत अप्रिय होती. ज्यात असे म्हटले होते की, अल्लाह त्याच्या शिक्षेला विरोध करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना पाहतो आहे. पण ते निरर्थक आहेत.. आमची मुले अल्लाहची शूर सेवक आहेत. ते त्यांचे काम पूर्ण करतील . त्यात पुढे शनिवारी जेव्हा विद्यार्थी उपस्थित नसतील तेव्हा शाळेच्या इमारतींमध्ये बॉम्बस्फोट करण्याच्या योजनेचाही उल्लेख होता. धमक्यांनंतर शाळांनी तातडीने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत बॉम्ब निकामी करणारे पथक आणि अग्निशमन अधिकारी तैनात केले. तथापि, परिसरात केलेल्या व्यापक शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. (हेही वाचा, Delhi Shocker: लग्नाच्या दबावामुळे प्रियकराकडून गर्भवती प्रेयसीची हत्या, मृतदेह हरियाणातील शेतात पुरला)
वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे चिंता वाढल्या
दिल्लीतील अनेक शाळांना सलग दुसऱ्या दिवशी धमकीचा ईमेल आला आहे. शुक्रवारी दिल्लीतील 30 हून अधिक शाळांना पाठवलेल्या अशाच प्रकारच्या बनावट बॉम्ब धमक्यांनंतर आजही ईमेल पाठवून धमकी मिळाल्याची घटना घडली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवी कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुरा, हे ईमेल भारताबाहेरुन आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या सकृतदर्शनी आम्हास कोठेही संशयास्पद वस्तू, हालचाल आढळली नाही. मात्र, तरीदेखील पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.
खंडणीसाठी धमकी?
यापूर्वी लक्ष्य करण्यात आलेल्या प्रमुख संस्थांमध्ये पश्चिम विहारमधील भटनागर पब्लिक स्कूल, श्रीनिवासपुरी येथील केंब्रिज स्कूल आणि डी. पी. एस. ईस्ट ऑफ कैलाश यांचा समावेश आहे. 8 डिसेंबर रोजी पाठवलेल्या ईमेलमध्ये 30,000 डॉलर्सच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे सुरक्षेची चिंता आणखी वाढली होती.
सरकार आणि कायदेशीर प्रतिसाद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा धमक्यांच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आणि भविष्यात होणारे अडथळे टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्याच्या गरजेवर भर दिला. पूर्वीच्या घटनांच्या प्रतिसादात, दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना बॉम्बच्या धमक्या हाताळण्यासाठी तपशीलवार मानक कार्यप्रणालीसह (एसओपी) सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. अलीकडच्या कोणत्याही घटनेत कोणतीही स्फोटके सापडली नसली तरी, या घटना शाळांमध्ये कडक सुरक्षा प्रोटोकॉलची तातडीची गरज अधोरेखित करतात. या ईमेलच्या स्त्रोताचा तपास सुरू आहे आणि अधिकाऱ्यांनी पालकांना आश्वासन दिले आहे की सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे पोलिसांनी म्हटले.