Heatwave Hits Homeless People: राजधानी दिल्लीमध्ये उष्णतेची लाट बेघरांसाठी काळ, 9 दिवसांत 192 जणांचा मृत्यू; हवामान अंदाजानुसार तापमान चढेच
या लाटेत 11 जून ते 19 जून दरम्यान 192 बेघर लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट या एनजीओने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा इतक्या कमी कालावधीत नोंदवल्या गेलेल्या सर्वाधिक मृत्यूंची सर्वाधिक संख्या दर्शवतो.
देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे (South-West Monsoon) दाखल झाले. परिणामी मान्सून म्हणून ओळखला जाणारा पाऊस बरसू लागला आहे. असे असले तरी उत्तरेकडे तापमान चढच आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्यापही उष्णता वाढत असून काही ठिकाणी उष्णतेची लाट (Delhi Heat Wave) पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली येथे नुकतीच उष्णतेची लाट पाहायला मिळाली. या लाटेत 11 जून ते 19 जून दरम्यान 192 बेघर लोकांचा मृत्यू ( Death Due To Heatstroke) झाल्याची माहिती आहे. सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट या एनजीओने याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा इतक्या कमी कालावधीत नोंदवल्या गेलेल्या सर्वाधिक मृत्यूंची सर्वाधिक संख्या दर्शवतो.
24 तासांत 14 हून अधिक मृत्यूची
सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या 72 तासांत राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, नोएडामधील आरोग्य विभागाने गेल्या 24 तासांत 14 हून अधिक मृत्यूची नोंद केली आहे, मृत्यूसही उष्माघात हेच कारण असल्याचा संशय आहे. शहरातील इतर रुग्णालयांमध्येही उष्णतेची लाट आल्याने उद्भवलेल्या आजारांचा सामना करणारे रुग्ण आहेत. (हेही वाचा, Heatstroke Cases in India: यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताला सामेरे गेलेल्या नागरिकांचा आकडा 40 हजारांच्यावर - रिपोर्ट)
मृतांमध्ये 80% बेघर
सेंटर फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंटचे कार्यकारी संचालक सुनील कुमार अलेदिया यांनी इंडिया टुडेला अधिक माहिती देताना सांगितले की, "11 ते 19 जून या त्रासदायक कालावधीत, दिल्लीत उष्णतेच्या लाटेमुळे 192 बेघर लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ही चिंताजनक आकडेवारी समाजातील सर्वात असुरक्षित गटांपैकी एक असलेल्या बेघर नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्कता अधोरेखीत करते. उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झालेल्यांच्या एकूण संख्येत 80% बेघर व्यक्तींचा वाटा आहे. अलेडियाने वाढत्या तापमानाला कारणीभूत ठरणाऱ्या वायुप्रदूषण, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यासारख्या घटकांकडे लक्ष वेधले, ज्यामुळे बेघर लोकांची परिस्थिती अधिकच बिकट होते, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Heatwave Alert: उत्तर भारतात उष्णतेची लाट; यूपीमध्ये 33 जणांचा मृत्यू, बिहारमध्ये तापमानाने 128 वर्षांचा विक्रम मोडला; जाणून घ्या IMD हवामान अंदाज)
सरकारी योजनांचाही लाभ नाही
शहरांतील बेघर लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे.ते मिळत नसल्याने त्यांचे निर्जलीकरण आणि संबंधित आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. गंभीर परिस्थिती असूनही, अनेक बेघर लोकांना ओळख दस्तऐवज आणि कायमचा पत्ता नसल्यामुळे दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM-SUH) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांमधून वगळण्यात आले असल्याचे अलेदिया सांगतात.
दरम्यान, वाढत्या उष्णतेप्रमाणेच राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाहीसुद्धा जाणवू लागली आहे. पाणी वेळेवर आण पुरेशा प्रमाणात येत नसल्याने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो आहे. एका टॅंकरपाठी हजारो लोक धावत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांतून नियमीत दिसू लागले आहे.