दिल्लीत 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी; शाहीन बागेसाठीही नियम लागू, पालन न केल्यास होणार कारवाई

हा आदेश सर्वांना लागू आहे

Shaheen Bagh Protest (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूपासून (Corona Virus) बचाव करण्यासाठी दिल्ली सरकारने (Delhi Government) 50 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. हा आदेश सर्वांना लागू आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिली. मग ते निषेध करणारे असोत वा आणखी कोणी असोत, प्रत्येकालाच या नियमाचे पालन करावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या या निर्णयाच्या कार्यक्षेत्रातून लग्न सोहळ्यास दूर ठेवण्यात आले आहे. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, या नियमानुसार कोणत्याही निदर्शनास मान्यता देण्यात येणार नाही आणि ते शाहीन बागेलाही (Shaheen Bagh) लागू होईल. दिल्ली सरकारच्या या निर्णयानंतर गेल्या 93 दिवसांपासून सुरू असलेले शाहीन बाग प्रदर्शन संपू शकते.

यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या घरातील 'जनता संवाद' कार्यक्रम बंद ठेवला आहे. हा सार्वजनिक संवाद सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 11 या वेळेत चालतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर अरविंद केजरीवाल या कार्यक्रमांतर्गत आपल्या घरी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत कोरोना विषाणूची लागण झालेल्या सात पैकी चार जणांवर उपचार सुरू आहेत. ही प्रकरणे जसजशी वाढतील तस तसे पुरेशा बेडची व्यवस्था केली जाईल. 31 मार्चपर्यंत दिल्लीत 50 हून अधिक लोकांचे धार्मिक, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय बैठका होणार नाहीत. (हेही वाचा: आता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हातावर मारला जाणार निळ्या शाईचा शिक्का; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)

सर्व ऑटो, टॅक्सी यांना संक्रमण मुक्त केले जाणार आहे. बर्‍याच ठिकाणी हँड सॅनिटायझर्स प्रदान केले जातील. 50 हून अधिक लोकांचा समावेश असलेल्या कोणत्याही प्रदर्शनास परवानगी दिली जाणार नाही. दिल्ली मेट्रोमध्येही थर्मल टेस्टिंग शक्य आहे का ते पाहिले जाईल. दरम्यान, कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता, शाहिन बागमधील प्रदर्शन संपुष्टात आणण्याच्या आदेशाची मागणी करीत, भाजप नेते नंद किशोर गर्ग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.