Cyclone Tauktae च्या स्थितीत गुजरात मध्ये जाणवले 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के, मुंबईसह केरळात अलर्ट जाहीर
अमेरली राजुला जवळ आज (17 मे) सकाळीच हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) स्थितीत आता गुजरात मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अमेरली राजुला जवळ आज (17 मे) सकाळीच हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 4.5 रिश्टर स्केल ऐवढी भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. मात्र कोणती जिवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. याच दरम्यान तौक्ते चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीभागात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.(Cyclone Tauktae मुळे केरळ मधील तिरुअनंतपुरम येथे घरांचे मोठे नुकसान See Pics)
तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टी भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. या नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करण्यासाठी एनडीआरएफच्या 50 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरात मधील कच्छ येथे चक्रीवादळामुळे होण्याऱ्या नुकसानीची शक्यता पाहता प्रशासन अलर्टवर आहे. मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हवामान खात्याने सुचित केले आहे की, चक्रीवादळ 24 तासात रौद्र रुप धारण करणार आहे. आपली दिशा बदलून आज संध्याकाळ पर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर 18 मे रोजी सकाळी हे वादळ पौरबंदर आणि महुवा दरम्यान गुजरात येथून जाणार आहे.
तसेच मुंबईत सुद्धा आज वेगाने वारे वाहण्यासह तुफान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत 5 ठिकाणी अस्थायी शेल्टर होमची उभारणी करण्यात आली आहे. पश्चिम मुंबईत एनडीआरएफच्या 3 तुकड्या आणि पुरापासून बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.(Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा जोर आणखी वाढणार, मुंबई-ठाणे येथे तुफान पावसाची शक्यता)