Cyber Crime: अनोळखी नंबरवरून येत राहिले कॉल्स, अचानक खात्यातून कट झाले 50 लाख रुपये; सायबर फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, पीडितेला ओटीपी प्राप्त होते होते, मात्र त्याचा फोन कॉम्प्रमाइज केला गेला असल्याने, त्याला ती गोष्ट समजली नाही.
दिल्लीत (Delhi) सिक्युरिटी एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीसोबत फसवणुकीचे (Cyber Crime) एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. या व्यक्तीच्या खात्यातून तब्बल 50 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, पीडितेने फोनवरील ओटीपी कोणासोबतही शेअर केला नव्हता, तरी त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आले. प्रकरण 13 नोव्हेंबरचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित घरी असताना, एका अनोळखी नंबरवरून त्याच्या फोनवर कॉल आला.
पीडितेने फोन उचलला मात्र पलीकडून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर अनेक वेळा वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत राहिले. ज्यामध्ये काही मिस्ड कॉल होते. पीडितेने 2-3 वेळा फोन उचलला, पण पलीकडून आवाज आला नाही. सुमारे तासभर ही प्रक्रिया चालल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याला फोनवर मेसेज आला, जो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या खात्यातून सुमारे 50 लाख रुपये काढण्याचा तो मेसेज होता.
हा मेसेज पाहून व्यक्तीने ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, पीडितेला ओटीपी प्राप्त होते होते, मात्र त्याचा फोन कॉम्प्रमाइज केला गेला असल्याने, त्याला ती गोष्ट समजली नाही. हेच ओटीपी वापरून चोरांनी त्याच्या खात्यातून पैसे उकळले. (हेही वाचा: देशात पुन्हा होणार नोटबंदी? राज्यसभेत भाजप खासदार मोदींची नोटबंदीची मागणी; पहा व्हिडीओ)
दरम्यान, लोक वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल व्यवहारांसाठी मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर करत आहेत, त्यामुळे सरकारने सायबर सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतेही मोबाईल ऍप्लिकेशन देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवू शकत नाही किंवा केवळ सायबर चोर कोणाच्या पैशाची फसवणूक करू शकणार नाहीत.