Cryptocurrency In India: क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचा भ्रामक दावा; अशा 'बेजबाबदार' क्रिप्टो जाहिराती ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक अपेक्षित आहे
क्रिप्टोकरन्सीमधील (Cryptocurrency) गुंतवणुकीवर भरघोस परताव्याच्या भ्रामक दाव्यांच्या चिंतेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली या विषयावर भविष्यातील कृतींचा निर्णय घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारी सूत्रांनी सांगितले की, क्रिप्टोकरन्सीसारख्या अनियंत्रित बाजारांना मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याचे स्रोत बनू दिले जाऊ शकत नाही. सरकारने, मोठा परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या क्रिप्टोकरन्सी जाहिरातींवर कठोर भूमिका घेण्याचा विचार केला आहे. मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत असणाऱ्या अशा जाहिरातींना प्रतिबंधित करण्याचे उद्दिष्ट भारत सरकार ठेवत आहे. अशा जाहिराती IPL 2020 आणि ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांदरम्यान भरपूर प्रमाणात दिसल्या होत्या.
शनिवारी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिप्टो इंडस्ट्रीमधील लोकांची बैठक झाल्यांनतर त्याबाबत माहिती देणाऱ्या मेमोमध्ये म्हटले आहे की, जास्त नफ्याचे आश्वासन देणाऱ्या अशा जाहिरातींबद्दल सरकारने स्पष्टपणे आपली नाराजी दर्शविली आहे. क्रिप्टो स्टेकहोल्डर्स आणि सरकारमध्ये एकमत झाले आहे की अशा जाहिराती तरुणांची दिशाभूल करत आहे आणि त्यांना आळा घालणे आवश्यक आहे.
CoinSwitch Kuber, CoinDCX आणि WazirX सारख्या क्रिप्टो प्लेयर्सनी अलीकडेच सर्व प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती लाँच केल्या. अशा जाहिरातींमध्ये त्यांनी प्रथम गुंतवणूक करत असणाऱ्या लोकांना त्यांच्या क्रिप्टो गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याची हमी दिली. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) चा एक भाग असलेल्या ब्लॉकचेन आणि क्रिप्टो अॅसेट्स कौन्सिल (BACC) आणि CoinSwitch Kuber, CoinDCX, WazirX आणि Zebpay सारख्या कंपन्यांनी नुकत्याच दिलेल्या जाहिरातीत कोट्यावधी भारतीयांनी क्रिप्टो मालमत्तांमध्ये 6 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचा दावा केला आहे.
अजूनही क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता नाही, अशात भारतीय क्रिप्टो प्लेयर्स विविध प्लॅटफॉर्मवर लोकांवर जाहिरातींचा भडिमार करत आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक अपेक्षित आहे आणि संपूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.