CRPF च्या आणखी 9 जवानांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आकडा 335 वर पोहचला
त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन संबंधित सर्व नियमांचे पालन करावे अशा सुचना वारंवार दिल्या जात आहेत.
देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन संबंधित सर्व नियमांचे पालन करावे अशा सुचना वारंवार दिल्या जात आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. याच दरम्यान आता सीआरपीएफच्या आणखी 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 335 वर पोहचला आहे. तसेच 2 सीआरपीएफच्या जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 121 जणांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाचे देशावरील महासंकट पाहता त्याचा सर्वाधिक फटका हातवर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. तसेच सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी पावले उचलत आहेत. नागरिकांना सध्या कोरोनाच्या काळात स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच देशाची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आलेली आहे.(भारतात कोविड 19 च्या एकूण 26 लाखांहून अधिक सॅपल टेस्ट तर मागील 24 तासांत 1 लाखाहून अधिक नागरिकांची चाचणी- ICMR ची माहिती)
दरम्यान, मागील 24 तासांत देशात 5,609 कोरोनाग्रस्त नवे रुग्ण आढळून आले असून 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,12,359 इतका झाला असून अद्याप 63624 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 3435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात अधिक नागरिक कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 39297 झाला असून यात 1,390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.