Coronavirus in India: भारतात COVID-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 10 लाखांचा टप्पा; 34,956 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,03,832 वर
देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून येथे 2,84,281 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडूत 1,56,369 कोरोनाचे एकूण रुग्ण आढळले आहेत.
भारतात (India) कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येने आता 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांत 34,956 कोरोनाचे (COVID-19) रुग्ण आढळले असून 687 रुग्ण दगावले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,03,832 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 25,602 वर पोहोचली आहे. देशात काल दिवसभरात 22,942 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे देशात आतापर्यंत 6,35,757 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
देशात सद्य घडीला 3,42,473 रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात असून येथे 2,84,281 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडूत (Tamil Nadu) 1,56,369 कोरोनाचे एकूण रुग्ण आढळले आहेत. Coronavirus in India: भारतामधील कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येने पार केला 10 लाखाचा टप्पा, देशात आतापर्यंत 25,605 रुग्णांचा मृत्यू- Worldometers
कोरोना प्रकरणात भारत जगात तिसर्या क्रमांकावर आहे. मृत्यूच्या बाबतीत भारत सध्या आठव्या क्रमांकावर आहे, परंतु आठवड्यात किंवा दहा दिवसांत तो सहाव्या क्रमांकावर येईल. सध्या जगामध्ये अमेरिकेत सर्वाधिक, 3,649,049 कोरोनाचे रुग्ण आहेत व तिथे 1,40,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांनतर 1,978,236 रुग्ण संख्येसह ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असून, तिथे 75,697 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत, रशिया व पेरू या देशांचा नंबर लागतो. सध्या या यादीमध्ये पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर असून, पाकिस्तानमध्ये कोरोनाचे 2,57,914 रुग्ण आढळले आहेत.