COVID-19: भारतात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन आकडा 166 वर पोहचला

त्यानुसार भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याची एकूण 166 प्रकरणे समोर आली आहेत.

Coronavirus (Photo Credits: AFP)

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे जगभरतात पसरले आहे. त्यामुळे अनेक देशांनी त्यांच्या हवाई सीमारेषा बंद केल्या आहेत. याच कारणास्तव विविध कारणांसाठी परदेशात गेलेले भारतीय अडकले आहेत. याच पार्श्वभुमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी झळकवण्यात आली आहे. त्यानुसार भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याची एकूण 166 प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना व्हायरसमुळे अनेक राज्यांनी अनेक सेवा सुविधा काही कालावधीकरिता बंद केल्या आहेत. कोरोनाबाधित देशातील संख्या 166 वर पोहचली आहेत. यामध्ये 141 भारतीय नागरिक आणि 25 परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचसोबत देशात तीन जणांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून झळकवण्यात आलेली ही आकडेवारी आज सकाळी 9 वाजेपर्यंतची आहे.(Coronavirus Outbreak: सीबीएसईसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या चालू परीक्षा 31 मार्चपर्यंत तहकूब; मानव संसाधन विकास मंत्रालयाचा आदेश)

तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे समोर आले होते. त्यानुसार ते आज संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत.

मुंबई शहरात कोरोना व्हायरसचा वाढता धोका विचारात घेऊन मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करु नये तसेच, कोरोना व्हायरस संभाव्य संसर्ग टळावा यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मुंबईतील ऑर्केस्ट्रा / डान्स बार, डिस्कोथेक, पब, लाइव्ह बँड आणि डीजे बंद राहणार आहेत. मुंबई पोलिसांचा हा आदेश 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे.