दिलासादायक! '2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin सुरक्षित'- Bharat Biotech चा दावा
ही लस मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे डेटा सादर केला होता
देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, स्वदेशी लस निर्माता कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) दावा केला आहे की, त्यांची कोवॅक्सिन (Covaxin) ही लस 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर सुरक्षित, सुसह्य आणि इम्युनोजेनिक असल्याचे फेज II आणि III च्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. सध्या देशात लहान मुलांच्या लसीकरणाबाबत चर्चा सुरु असताना, भारत बायोटेकची ही घोषणा या संदर्भात दिलासादायक बाब ठरली आहे.
कोवॅक्सिन सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे सिद्ध झाल्यास 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला गती मिळू शकेल. ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकतीच बालकांचे लसीकरण सुरू करण्यासही शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. ख्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरच्या रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमायक्रॉन प्रकाराचा धोका लक्षात घेऊन, बुस्टर डोससह 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली होती.
भारत बायोटेकचे सीएमडी डॉ कृष्णा एला म्हणाले की, मुलांवरील क्लिनिकल चाचण्यांमधून आलेला डेटा अतिशय उत्साहवर्धक आहे. ही लस मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे डेटा सादर केला होता. 12-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी औषध नियामकाकडून अलीकडेच परवानगी मिळाली आहे. (हेही वाचा: भारतामध्ये Covovax, Corbevax कोविड 19 लसींना तसेच Molnupiravir या Anti-COVID-19 Pill ला मंजुरी)
याआधी भारतामध्ये कोविड-19 लसींमध्ये सीरम इन्स्टिट्युटच्या अजून एका लसीला म्हणजेच Covovax आणि Biological E च्या Corbevax या दोन लसींना काही अटींच्या अंतर्गत मान्यता देण्यात आली होती. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर काही तासांनंतर पंतप्रधान मोदींनी बालकांच्या लसीकरणाची घोषणा केली. संपूर्ण भारतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारीपासून बालकांचे लसीकरण सुरू होणार आहे.