Coronavirus: भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 606; महाराष्ट्रात एकूण 122 प्रकरणे
यासाठी उपाययोजना म्हणून सध्या केंद्र सरकारने 21 दिवस लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे.
भारतात कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. यासाठी उपाययोजना म्हणून सध्या केंद्र सरकारने 21 दिवस लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. आज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 70 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी ही 606 वर पोहचली आहे. यामध्ये 563 भारतीय नागरिक आणि 43 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, 43 लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.
तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूबाबत 5 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आता राज्यात या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची संख्या 23 झाली आहे. सध्या देशात महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोना बाधित लोकांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य, संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. त्यानंतर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आज दुपारी उज्जैन येथे एका 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे, हा मध्य प्रदेशामधील कोरोना व्हायरसमुळे झालेला पहिला मृत्यू आहे. (हेही वाचा: 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात केंद्र सरकारकडून दिलासा; आता 80 कोटी लोकांना गहू 2 रुपये किलो व तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळणार)
महाराष्ट्रानंतर केरळयेथे सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण आहेत. केरळमध्ये आज कोरोना विषाणूची 9 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 4 दुबईहून, 1 ब्रिटनमधून आणि 1 फ्रान्समधून परत आले आहेत. आता राज्यात एकूण कोरोना व्हायरस प्रकरणांची संख्या 118 झाली आहे. लव अग्रवाल, सहसचिव, आरोग्य मंत्रालय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 118 सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. आता देश दररोज 12,000 नमुन्यांची चाचणी घेण्यास तयार झाला आहे.