Coronavirus in India: भारतातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह राज्यांच्या प्रमुखांना दिला 'हा' सल्ला
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी देखील संवाद साधताना कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता प्रो-अॅक्टिव्ह होत आपल्याला ठोस पावलं उचलणं गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.
लॉकडाऊन मधून जशी नागरिकांना शिथिलता मिळाली तशी वर्दळ वाढली आणि आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून अनेकांना ही कोरोनाची दुसरी लाट असल्याची भीती आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यावर परिस्थितीचा आढावा घेताना सार्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी देखील संवाद साधताना कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता प्रो-अॅक्टिव्ह होत आपल्याला ठोस पावलं उचलणं गरजेचे असल्याचं म्हटलं आहे. आता लस हातामध्ये असली तरीही काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलताना आरटीपीआर टेस्ट वाढवण्याचे आणि त्यानंतर शक्य तितक्या लवकर संक्रमित रूग्णांच्या कॉन्टॅक्टचे ट्रेसिंग करणं गरजेचे असल्याचं सांगितलं आहे. तसेच मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणं आवश्यक असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अनेक राज्यात आजही केवळ रॅपिड अॅन्टिजन टेस्टच्या भरवश्यावर काम सुरू आहे ते थांबवून आरटीपीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रमाण 70% पेक्षा अधिक असाव्यात.
लसीकरणामध्येही लोकांच्या मनात समज-गैरसमज आहे. आता राज्यांमध्ये कोविड लसींचे वेस्टेज सुरू आहे ते थांबवले पाहिजे. जुन्या लसी आधी वापरल्या जाव्यात आणि प्रत्येकाने 0% लसींच्या वेस्टेजच्या दृष्टीने काम करावं असा सल्ला नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना आवर्जुन दिला आहे. आता देशात टिअर 2,3 मध्येही कोरोना पसरत आहे. गावा-गावात कोरोना घुसल्यास त्याला रोखण्याची सक्षम आरोग्ययंत्रणा आपल्याकडे नाही त्यामुळे टेस्टिंग वाढवणं गरजेचे आहे. आपला आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स आणि यश हलगर्जीपणामध्ये बदलू नये याकडे लक्ष देणंही गरजेचे असल्याचं नरेंद्र मोदींनी नमूद केले आहे.