Coronavirus: भारतात आतापर्यंत एकूण 1,69,797 रुग्ण COVID19 पासून झाले बरे; देशाचा रिकव्हरी रेट 51.08 टक्क्यांपर्यंत वाढला

आता तर भारत जगातील चौथा मोठा कोरोना बाधित देश बनला आहे. देशातील कोरोनाची प्रकरणे 3.30 लाखांवर गेली आहेत

Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची गती वाढत आहे, रोज कोरोना संसर्ग ग्रस्तांचा मृत्यू होत आहेत. आता तर भारत जगातील चौथा मोठा कोरोना बाधित देश बनला आहे. देशातील कोरोनाची प्रकरणे 3.30 लाखांवर गेली आहेत, गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज सरासरी 11,000 नवीन प्रकरणे समोर येत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 15 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोविड-19 सकारात्मक रुग्णांची संख्या वाढून 3,32,424 झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 9520 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या सर्वांमध्ये एक सकारात्मक गोष्ट म्हणजे देशात, आतापर्यंत एकूण 1,69,797 रुग्ण COVID19 पासून बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 7419 लोक या आजारातून बरे झाले आहे व अशाप्रकारे सध्या देशाचा रिकव्हरी रेट 51.08 टक्के इतका झाला आहे. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. याचाच अर्थ असा की देशात अर्ध्यापेक्षा जास्त लोक या आजारातून बरे झाले आहेत. सध्या देशात 153106 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांविषयी बोलायचे तर, कोविड-19 चे देशात 11,502 नवीन प्रकरणे समोर आली असून, 325 लोक मरण पावले आहेत. (हेही वाचा: भारतात नोव्हेंबरमध्ये समोर येतील कोरोना व्हायरस संसर्गाची सर्वात जास्त प्रकरणे? ICMR ने अभ्यासाबाबत केला मोठा खुलासा)

अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांपैकी भारत नववा देश आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत एकूण 9,520 लोकांनी प्राण गमावले आहेत. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात आतापर्यंत 3,950 लोकांचा मृत्यू झाला आहे, गुजरातमध्ये 1,477 लोक मरण पावले आहेत, तर दिल्लीत 1,327 लोक मरण पावले आहेत.