Coronavirus: एका 'प्रोटीन'मुळे भारतासह आशियाई देशांपेक्षा पाश्चात्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक; संशोधनातून खुलासा, जाणून घ्या सविस्तर
एका अहवालात यामागचे कारणही सांगण्यात आला आहे. त्यानुसार मानवी शरीरात आढळणारे एक प्रथिने (Protein) त्यासाठी जबाबदार आहे
अजूनही बऱ्याच देशांमध्ये प्राणघातक कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका कमी झाला नाही. अजूनही अनेक देश या विषाणूच्या संसर्गाशी सामना करीत आहेत. आतापर्यंत जगात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 23.36 लाखांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र इतर देशांच्या तुलनेत याबाबत भारताची कामगिरी उत्तम राहिली आहे. आता दावा केला जात आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण भारतासह आशियाई देशांपेक्षा पाश्चात्य देशांमध्ये जास्त आहे. एका अहवालात यामागचे कारणही सांगण्यात आला आहे. त्यानुसार मानवी शरीरात आढळणारे एक प्रथिने (Protein) त्यासाठी जबाबदार आहे.
पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्समधील वैज्ञानिकांनी, पाश्चात्य देशांच्या तुलनेत आशियाई देशांमधील कोरोना विषाणूचे प्रमाण कमी होण्यामागील जैविक कारणांचा अभ्यास केला आहे. या वेळी शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, मानवी शरीरात असणारे न्यूट्रोफिल एलास्टेस (Neutrophil Elastase) नावाचे प्रथिन यासाठी कारणीभूत आहे. मानवी शरीरात जास्त असणारी या प्रथिनाची मात्रा कोरोना विषाणूला शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास, त्यांचे प्रमाण वाढवण्यास आणि वेगाने पसरण्यास मदत करते. इन्फेक्शन, जेनेटिक्स आणि इव्होल्यूशन या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते हे प्रोटीन आणखी एक प्रथिने बनवते. त्याचे नाव अल्फा-1 अँटीट्रिप्सिन (Alpha-1 Antitrypsin) किंवा एएटी आहे. जेव्हा एएटीची कमतरता असते तेव्हा पेशींमध्ये न्यूट्रोफिल इलेस्टेसची पातळी खूप जास्त होते आणि नंतर ते कोरोना विषाणूच्या प्रसारास मदत करते. सर्वसाधारणपणे एएटीची कमतरता आशियाई देशांच्या लोकांपेक्षा युरोपियन देश आणि अमेरिकेत जास्त असते. म्हणूनच आशियाई देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरला नाही.
हे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व निधान बिस्वास आणि पार्थ मजूमदार करीत आहेत. त्यांच्या मते, बर्याच लोकांना असे वाटते की भिन्न भौगोलिक परिस्थितीनुसार कोरोना विषाणूचा प्रसार होणाची पद्धत देखील भिन्न आहे. याआधी सर्वात मोठी गोष्ट अशी मानली जात होती की, आशियातील उच्च तापमानामुळे कोरोनाचा प्रसार फारसा होऊ शकला नाही. आता वैज्ञानिकांच्या मते यामागे सामाजिक आणि नैसर्गिक कारण नसून, जैविक कारण आहे.