Coronavirus: केंद्र सरकारचे आदेश, 50 % केंद्रीय कर्मचारी करणार 'वर्क फ्रॉम होम'; विदेशातील विमानांना भारतात येण्यास बंदी
तसेच, त्यांना एक एक आठवड्याच्या अवधीनंतर कार्यालयात येण्याचे निर्देश द्यावेत. पहिल्या आठवड्यात रोष्टरवर निर्णय करण्यासाठी अखत्यारितील इतर विभागप्रमुखांनाही सुचना द्या
कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयाबाबतचे आदेश केंद्राने संबंधित विभागाला पाठवले आहेत. विदेशातून भारतात येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अपवाद वगळता एकही आंतरराष्ट्रीय विमान भारतातील विमातळांवर येणार नाही. तसेच, केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुमारे 50% केंद्रीय कर्मचारी हे 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) करणार आहेत. केंद्र सरकारने म्हटले आहे की, सरकारी कार्यालयं सुरु राहतील. मात्र या कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असेल. तसेच हे कर्मचारी वेगवेगळ्या वेळी कार्यालयात येतील. एकाच वेळी सर्व कर्मचारी कार्यालयात येणार नाहीत, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय कार्मिक मत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांनी हे ध्यानात घ्यावे की त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये ब आणि क श्रेणीतील केवळ 50 टक्के कर्मचारीच कार्यालयात येतील. बाकिचे सर्व कर्मचारी घरुन काम करतील.
केंद्र सरकारच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व विभागप्रमुखांना आदेश देण्यात येत आहेत की, त्यांनी ब आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी साप्ताहिक रोष्टर तयार करावे. तसेच, त्यांना एक एक आठवड्याच्या अवधीनंतर कार्यालयात येण्याचे निर्देश द्यावेत. पहिल्या आठवड्यात रोष्टरवर निर्णय करण्यासाठी अखत्यारितील इतर विभागप्रमुखांनाही सुचना द्या. तसेच, या कर्मचाऱ्यांना कार्यालयाजवळ किंवा स्वत:च्या वाहनानेच कार्यालयात येण्यासा सांगा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा, Coronavirus: खबरदार! पळून जाल तर, क्वारंटाईन विभागातून पळणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा)
कर्मचाऱ्यांच्या समूहाची विभागणी 3 गटात करण्यात यावी. त्यातील पहिला गट सकाळी 9 ते सायंकाळी 5.30, सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 आणि साकाळी 10 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत अशा गटात विभागा, अशाही सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.