Congress Bharat Jodo Yatra: उद्यापासून सुरु होणार काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा'; पाच महिन्यांत कापले जाणार कन्याकुमारी ते श्रीनगर असे 3,570 किमीचे अंतर

सकाळच्या सत्रात अल्पसंख्येने सहभागी होताना दिसतील, तर संध्याकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येईल. दररोज सरासरी 22-23 किमी चालण्याची योजना आहे.

Congress | (File Image)

उद्यापासून काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू होत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान, भारतासमोरील गंभीर प्रश्नांवर देशवासीयांशी थेट संवाद साधला जाणार आहे. काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा यांनी मंगळवारी राजीव भवन येथे प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दीडशे दिवसांत ही यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असे साडेतीन हजार किमीचे अंतर कापणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेसचे माजी नेते राहुल गांधी बुधवारी श्रीपेरंबुदूर येथील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी प्रार्थना सभेला उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर ते कन्याकुमारी येथे एका कार्यक्रमात सहभागी होतील जिथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर, राहुल गांधी इतर काँग्रेस नेत्यांसह सार्वजनिक रॅलीच्या ठिकाणी जातील जिथे यात्रेची औपचारिक सुरुवात केली जाईल. प्रियांका गांधी वाड्रा यांनी एका व्हिडिओ संदेशात लोकांना शक्य असेल तेथे यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. देशात नकारात्मक राजकारण केले जात असून जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याने, या यात्रेची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, ‘महागाई, बेरोजगारी यांसारख्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी, सुमारे पाच महिन्यांत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या कन्याकुमारी ते श्रीनगर या 3,570 किमीच्या रॅलीचा औपचारिकपणे प्रारंभ केला जाईल. प्रत्यक्षात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते पदयात्रेला सुरुवात करतील.

यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देतील. यात्रेच्या अगोदर, राहुल यांनी रविवारी पक्षाच्या 'हल्ला बोल रॅली'मध्ये सांगितले की, सरकारने सर्व रस्ते बंद केले आहेत आणि काँग्रेसला आता जनतेत जाऊन सत्य सांगावे लागेल आणि म्हणूनच पक्ष 'भारत' जोडो यात्रा सुरु करत आहे. (हेही वाचा: महागाईविरोधात दिल्लीत काँग्रेसचा हल्लाबोल; अशोक गेहलोत म्हणाले, मोदी सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप मोठा फरक आहे)

ही पदयात्रा दोन बॅचमध्ये चालेल, एक सकाळी 7-10:30 आणि दुसरी दुपारी 3:30 ते 6:30. सकाळच्या सत्रात अल्पसंख्येने सहभागी होताना दिसतील, तर संध्याकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येईल. दररोज सरासरी 22-23 किमी चालण्याची योजना आहे. काश्मीर ते कन्याकुमारी हा आपला प्रवास कोणत्याही प्रकारे ‘मन की बात’ नसून लोकांच्या चिंता आणि मागण्या दिल्लीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा यामागचा हेतू असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पक्षाने राहुल गांधींसह 119 नेत्यांना 'भारत यात्री' म्हणून वर्गीकृत केले आहे, जे कन्याकुमारी ते श्रीनगर हे संपूर्ण अंतर कापतील.