Cloud Burst in Himachal Pradesh: कुल्लू येथे ढगफुटी; एक ठार, तीन जखमी
यापूर्वीही राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू (Kullu) जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. कुल्लूच्या कियासमध्ये (Kias) ढगफुटी (Cloud Burst) झाली आहे. ढगफुटीमुळे पूर आला आहे. पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झाले आहेत. यासह अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. डीएसपी मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कुलूच्या कियास गावात ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. याशिवाय 9 वाहनांचेही नुकसान झाले आहे. (हेही वाचा - kedarnath Dham मंदिर परिसरात फोटो काढणे आणि रिल्स बनवण्यावर बंदी)
हिमाचल प्रदेशातील हवामानाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यापूर्वीही राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मुसळधार पाऊस आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे हिमाचलमधील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने हिमाचल प्रदेशात 17 आणि 18 जुलै रोजी पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या शिमला कार्यालयाने 17 जुलैपर्यंत चंबा, कांगडा, सिरमौर, शिमला आणि कुल्लू जिल्ह्यांतील काही पाणलोट आणि शेजारच्या भागात "मध्यम ते उच्च धोका" असा इशारा जारी केला आहे.
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पावसाने हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. ढगफुटी, भूस्खलन आणि पुराच्या घटनांमध्ये आतापर्यंत 108 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शनिवारी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे 8,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.