Jammu Blast: 9वी मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने लंच बॉक्समधून आणला होता ग्रेनेड बॉम्ब

जम्मू काश्मिरमध्ये हाय अलर्ट देताना अल्पवयीन मुलाच्या मदतीने हल्ला होऊ शकतो इतपत माहिती दिली असल्याने पोलिसही सतर्क होते.

bomb blast at Jammu city bus stand (Photo Credits: Twitter)

काल ( 7 मार्च) दुपारी बाराच्या सुमारास जम्मू सिटी बस (Jammu City Bus) परिसर ग्रेनेड बॉम्ब (Grenade) हल्ल्याने हादरला. या हल्ल्यामध्ये 2 जण ठार झाले तर 28 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पाच तासामध्ये जम्मू काश्मिरमध्ये पोलिसांनी यासिर भट्ट या हल्लेखोराला अटक केली. मात्र आज जम्मू काश्मिर पोलिसांनी या प्रकरणामध्ये अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. नववीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याने लंचबॉक्समधून ग्रेनेड आणला. डब्यामध्ये भाताखाली ग्रेनेड लपवला होता. Jammu Blast: जम्मू सिटी बसस्टॅन्ड परिसरात ग्रेनेड हल्ला प्रकरणात 'यासिर भट्ट'ला अटक, गुन्ह्याची कबुली दिल्याची जम्मू काश्मिर पोलिसांची माहिती

NDTV ने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मिर पोलिसांना शहरामध्ये हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली होती अशी माहिती दिली आहे. उत्तर काश्मिरमध्ये कुलगाम या भागात अल्पवयीन मुलगा राहत होता. नागरोटा येथील चेकपॉंईटवरून या 15 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले.

अवघ्या 15 वर्षाच्या मुलाने युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून ग्रेनेड हल्ला कसा करायचा याचं शिक्षण घेतलं. जम्मू काश्मिरमध्ये हाय अलर्ट देताना अल्पवयीन मुलाच्या मदतीने हल्ला होऊ शकतो इतपत माहिती दिली असल्याने पोलिसही सतर्क होते. या मुलाला जम्मूला येण्यासाठी कोणी मदत केली? याबाबत अधिक तपास सुरू आहे. कारण सुमारे 250 किमीचा प्रवास ग्रेनेड घेऊन सुरक्षितपणे कसा करण्यात आला? हा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

जम्मू सिटी बस परिसरातील हल्ल्यामागे हिजबुल मुजाहिद्दीनचा हात होता. हिजबुलचा म्होरक्या फारुख अहमद भट याने मुलावर जबाबदारी सोपावल्याची माहिती आहे. जम्मूमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हा हल्ला घडवून आणला होता.