Panjab Politics: पंजाबमध्ये राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष सुरु; राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा
राज्यपालांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन निंदनीय आणि अन्याय करणारं असल्याचं म्हटलं होतं.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असून मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आहे. आपण मागितलेली माहिती राज्य सरकार देत नसल्याचा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केला आहे. इतकंच नाही, तर पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा देखील पुरोहित यांनी दिला आहे. सध्या राज्यपाल आणि पंजाबमधील आप सरकारमध्ये पत्रयुद्ध सुरू आहे. 22 जुलैला राज्यपालांनी मुख्यमंत्री मान यांना पत्र लिहून सरकारी शाळांमध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याने गळतीचे प्रमाण वाढल्याचा आरोप केला.तसेच याबाबतचा अहवाल राज्यपालांनी राज्य सरकारकडे मागितला आहे. (हेही वाचा - Wayanad Tragedy: केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मोठी दुर्घटना; जीप दरीत कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू, 3 जखमी)
राज्यपालांनी लिहलेल्या पत्रात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपालांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन निंदनीय आणि अन्याय करणारं असल्याचं म्हटलं होतं. तसेच राज्यपाल पुरोहित यांनी राज्याच्या सीमावर्ती भागाचा दौरा केला आणि त्यानंतर पंजाबमध्ये किराणा दुकानातही अमली पदार्थ (ड्रग्ज) मिळत असल्याचा गंभीर आरोप केला.राज्यपालांनी ही बाब निर्देशनात आणून दिल्यानंतर NCRB ने काही दारूची दुकानही सील केली होती. त्यानंतर राज्यपालांनी या सगळ्याचा रिपोर्ट मागितला होता. पंरतू हा राज्य सरकारकडून हा अहवाल आपल्याला मिळाला नसल्याचे आरोप राज्यपालांनी केला आहे.
ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, तिथं असा संघर्ष यापुर्वी ही पहायला मिळाला आहे. आम आदमी पार्टी आणि राज्यपाल यांच्यातील वादाची देखील ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्लीत देखील राज्यपाल आणि केजरीवाल सरकारमध्ये वाद झाला होता. महाराष्ट्रात देखील भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असताना अशाच प्रकारचे वाद होत होते.