Chennai Shocker: मुलीला चालत्या ट्रेनसमोर ढकलून तरुणाने काढला पळ; तरुणीचा मृत्यू, तपास सुरु

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्या (20) असे मृत मुलीचे नाव असून, ती अदमबक्कम येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणारा माणिकम यांची मुलगी आहे.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

चेन्नईतील (Chennai) सेंट थॉमस माउंट रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने तरुणीला चालत्या ट्रेनसमोर ढकलले व ट्रेनच्या धडकेने मुलीचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीला धक्का दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सेंट थॉमस माऊंट पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्या (20) असे मृत मुलीचे नाव असून, ती अदमबक्कम येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणारा माणिकम यांची मुलगी आहे. माणिकम हे गिण्डी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून काम करतात. सत्या ही टी.नगर येथील एका खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती.

नेहमीप्रमाणे सत्या गुरुवारी कॉलेजसाठी सेंट थॉमस माउंट रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती व ट्रेनची वाट पाहत होती. त्याचवेळी अदंबक्कम येथील सतीश (23) हा तेथे आला आणि त्याने सत्यासोबत जोरदार वाद घालायला सुरुवात केली. यादरम्यान त्याला राग आला आणि त्याने सत्याला तांबरम ते चेन्नई बीच रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनसमोर ढकलून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. ट्रेनला धडक बसून सत्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: सासरच्या छळामुळे 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू; ब्लेडने पोट चिरून बाळाला काढले बाहेर)

या बाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. चेन्नई पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आरोपी तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता, त्यामुळेच तो अनेक दिवस तिच्या मागे लागला होता. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. यापूर्वी नुंगमबक्कम रेल्वे स्टेशन परिसर येथे स्वाती नावाच्या तरुणीची भरदिवसा हत्या करण्यात आली होती.