मध्य रेल्वे ची मोबाईल वरून जोरदार तिकीटविक्री, एका दिवसात 30 लाखांची विक्रमी कमाई
मध्य रेल्वेत 24 तासांत 63 हजार 313 तिकिटांची विक्री करून यातून तब्बल 30 लाखांची विक्रमी कमाई केली.
डिजिटल इंडिया (Digital India) उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोबाईल मार्फत तिकीट (Mobile Ticket) विक्रीला सुरुवात केली होती. रेल्वे तिकीट विक्री केंद्रावरील मोठ्या रांगा टाळून वेळ वाचवणारी हे पद्धती अवघ्या काहीच दिवसात प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. परिणामी, शुक्रवार, 12 जुलै ला मुंबई विभागासह मध्य रेल्वे (Central Railway) वर सर्वाधिक तिकीट विक्रीची नोंद झाल्याचे समजत आहे. मुंबईसह मध्य रेल्वेत 24 तासांत तब्बल 63 हजार 313 तिकिटांची विक्री झाली. यातून मध्य रेल्वेने एका दिवसांत तब्बल 30 लाखांची विक्रमी कमाई केली. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यामध्ये सर्वात जास्त योगदान दिले असून एका दिवसांत तब्बल 61 हजार तिकिटांची विक्री करण्यात आली आहे.
ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या विक्रमात मुंबई विभागाने एकहाती 29 लाख 4 हजार 597 रुपयांची कमाई केली आहे, यापाठोपाठ पुणे विभागाने 1263 तिकिटांची विक्री केली, तसेच भुसावळ विभागाने 492 तिकीट, नागपूर विभागाने 215 तिकीट तर सोलापूर विभागाने 147 तिकिटांची विक्री केली आहे. आता UTS अॅपवर मुंबई, पुणे, नागपूर विभागातील लांब पल्ल्याचीही तिकीट होणार बुक !
दरम्यान, मोबाईलचा वाढता वापर पाहता प्रवाशांच्या दृष्टीने ही सुविधा अगदीच फायदेशीर आहे, रांगांमध्ये अडकून राहण्यापेक्षा या सुविधेचा लाभ घेऊन प्रवासाला निघण्याआधीच तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता, याआधी केवळ लांब पल्ल्यांसाठी ही सोया उपलब्ध होती मात्र आता लोकलच्या तिकिटासाठी सुद्धा मोबाईल ऍप उपलब्ध आहे.