CBSE Board 12th Exam Cancelled: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय
बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
CBSE Board 12th Exam Cancelled: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली CBSE च्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीअंती CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.हेदेखील वाचा- Unemployment In India: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात वाढली बेरोजगारी; तब्बल 1 कोटी लोकांनी गमावला रोजगार
बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ कार्यपद्धती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं मोदी म्हणाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम होता तो या निर्णयामुळं दूर कऱण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असंही मोदी म्हणाले.
तसेच गेल्या वर्षीप्रमाणे जर कोणा विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असेल तर CBSE बोर्डाकडून तसा पर्याय देखील देण्यात येईल, मात्र जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल तेव्हाच अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल असे सांगण्यात आले आहे.