असदुद्दीन ओवैसी यांच्या CAA विरोधी रॅलीत महिलेने दिल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल (Video)

बंगळुरूमध्ये (Bengaluru) सीएएविरोधी रॅलीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष, असदुद्दीन ओवैसी ( AIMIM chief Asaduddin Owaisi), यांना एका अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला

Woman created ruckus during AIMIM chief Asaduddin Owaisi's rally in Bengaluru (Photo Credits: Screenshot/ANI)

बंगळुरूमध्ये (Bengaluru) सीएएविरोधी रॅलीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष, असदुद्दीन ओवैसी ( AIMIM chief Asaduddin Owaisi), यांना एका अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला. सीएए, एनसीआर आणि एनपीआरच्या (CAA, NRC, NRP) विरोधात, टीपू सुलतान युनायटेड फ्रंटने आयोजित केलेल्या मेळाव्याला, संबोधित करण्यासाठी ओवैसी गुरुवारी शहरातील फ्रीडम पार्कमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी या सभेमध्ये अमुल्या नावाच्या युवतीकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' (Pakistan Zindabad) अशा घोषणा दिल्या गेल्या.

ओवैसी भाषण देण्यासाठी स्टेजवर येताच अमुल्याने माइक हातात घेतला आणि प्रथम तिने 'हिंदुस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी केली. पण नंतर ती 'पाकिस्तान जिंदाबाद' असेही ओरडू लागली. या मुलीबरोबर आणखी काही लोक स्टेजवर होते, त्यांनीही घोषणाबाजी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती बोलतच राहिली.

ही गोष्ट पाहून ओवैसी आणि संयोजकांना धक्काच बसला. पोलिसांनी तातडीने या मुलीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर ओवेसी यांनी तातडीने स्टेजवरूनच या घटनेचा निषेध केला. ही मुलगी स्टेजवरून खाली उतरल्यानंतर ओवैसी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या मुलीच्या विधानाचा संदर्भ घेऊन ते म्हणाले, ‘येथे घडलेल्या गोष्टींशी माझा आणि माझ्या पक्षाचा काही संबंध नाही. आमचा संपूर्ण लढा भारत वाचवण्यासाठी आहे. आमच्यासाठी भारत झिंदाबाद आहे आणि राहील. जे लोक पाकिस्तानसमर्थ घोषणाबाजी करीत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो.’

(हेही वाचा: ‘आम्ही 15 कोटी, 100 कोटींवर भारी पडू’; AIMIM नेते वारिस पठान यांचे वादग्रस्त वक्तव्य (Video))

या घटनेनंतर अमुल्याविरूद्ध, भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए (देशद्रोहाचा गुन्हा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत. चौकशीनंतर तिला न्यायालयात हजर केले जाईल.