SC Closed Isha Foundation Case: सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रतिष्ठान संदर्भातील खटला बंद; मुली प्रौढ आहेत, स्वेच्छेने आश्रमात राहतात, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाने अशा याचिकेवर चौकशीचे आदेश देणे योग्य नाही. पोलिसांनी आश्रमावर टाकलेला छापाही चुकीचा होता. दोन्ही मुली प्रौढ असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Sadhguru Jaggi Vasudev, Supreme Court (फोटो सौजन्य -X, Wikimedia Commons)

SC Closed Isha Foundation Case: ईशा फाऊंडेशन (Isha Foundation) चे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. ईशा फाऊंडेशनच्या आवारात आपल्या दोन मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शुक्रवारी कारवाई बंद केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाने अशा याचिकेवर चौकशीचे आदेश देणे योग्य नाही. पोलिसांनी आश्रमावर टाकलेला छापाही चुकीचा होता. दोन्ही मुली प्रौढ असल्याचे न्यायालयाने सांगितले. जेव्हा त्या आश्रमात गेल्या तेव्हा त्या 27 आणि 24 वर्षांच्या होत्या. त्या स्वतःच्या इच्छेने आश्रमात राहत आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात दिले आव्हान -

निवृत्त प्रोफेसर एस कामराज यांनी फाऊंडेशनच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कामराज यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेत आपल्या मुली लता आणि गीता यांना ईशा फाऊंडेशनच्या आश्रमात ओलिस ठेवण्यात आल्याचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने आश्रमाविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, पोलिसांनी ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व गुन्हेगारी प्रकरणांचे तपशील सादर करावेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला सुमारे 150 पोलिस तपासासाठी आश्रमात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर 3 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या फाउंडेशनविरुद्ध पोलिस तपासाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. (हेही वाचा - Relief for Sadhguru's Isha Foundation: सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती)

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देऊ, असे सांगितले होते. या प्रकरणावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही अशा संस्थेत पोलिसांची फौज पाठवू शकत नाही. मात्र, आपण चेंबरमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही महिलांशी ऑनलाइन चर्चा करू आणि त्यानंतरच आदेश वाचू. (हेही वाचा- Isha Foundation Controversy: 'आम्ही लोकांना लग्न करण्यास किंवा भिक्षुत्व स्वीकारण्यास सांगत नाही'; सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनने दिले स्पष्टीकरण)

तथापी, एस कामराज यांच्या दोन्ही मुलींशी चर्चा केल्यानंतर सरन्यायाधीशांनी हा आदेश दिला आहे. कामराज यांच्या मुलींनी फोनवरील संभाषणादरम्यान सीजेआयला सांगितले होते की, त्या आश्रमात स्वत:च्या इच्छेने राहत असून स्वत:च्या इच्छेने आश्रमातून बाहेर येऊ शकतात.