Bus Fell From Flyover Video: उड्डाणपुलावरुन बस कोसळली, 5 जण ठार, अनेक जखमी; ओडिसा राज्याती घटना सोशल मीडियावर व्हायरल
ही घटना सोमवारी (16 एप्रिल) सायंकाळी घडली. मृतांमध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.
Odisha Road Accident: ओडिशा राज्यातील जाजपूर येथे बस उड्डाणपुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातता (Tragic Bus Accident) पाच जण ठार तर किमान 40 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (16 एप्रिल) सायंकाळी घडली. मृतांमध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग-16 वर असलेल्या बाराबती पुलावरुन जाताना बस पुलाची संरक्षक भींत तोडून खाली कोसळली. या वेळी बसमध्ये जवळपास 47 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेचा एक व्हिडिओ (Bus Fell From Flyover Video) सोशल मीडिया मंच X वर व्हायरल झाला आहे.
अपघातात चार पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू
ओडिशातील जाजपूरचे एसपी विनित अग्रवाल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ही घटना पुरीहून पश्चिम बंगालच्या दिशेने जात असलेल्या बससोबत घडली. जखमींना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेत पाच लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. धर्मशाला पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक तपन कुमार नाईक यांनीही बसमधील पाच प्रवाशांच्या मृत्यूची पुष्टी केली. ते म्हणाले अपघातात चार पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे 40 लोक जखमी झाले आहेत, त्यांना कटक एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले आहे. (हेही वाचा, Pregnant Woman Dies in Odisha Poor Road Connectivity: ओडिशात खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेचा दुदैवी मृत्यू,घटनेने गावात एकच खळबळ)
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडून थेट खाली कोसळली. दरम्यान, या अपघाताची दखल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही घेतली आहे. या घटनेबाबत तीव्र शोख व्यक्त करत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना आणि मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी भावना व्यक्त केली. तर जखमींना लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केली. त्यासोबतच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
व्हिडिओ
परिवहन आयुक्त अमिताव ठाकूर यांनी अधिक माहिती दिली, की बस पश्चिम बंगालमधील हल्दियासाठी निघाली होती. दरम्यान, हा अपघात घडला. आम्ही अपघातग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टरांचे पथक तयार केली आहे. महिला आणि लहान मुलांसह जखमींना 16 रुग्णवाहिकांच्या मदतीने कटकला आणले जात आहे. बस क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आल्याने बचावकार्य संपले आहे.निखिल पवन कल्याण, जिल्हाधिकारी आणि जाजपूरचे जिल्हा दंडाधिकारी यांनी, बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटर आणि क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. अपघातातील बहुतेक प्रवासी पश्चिम बंगालचे होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, या धक्कादायक अपघातामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर जमली होती.