Uttar Pradesh Shocker: बेरोजगार व्यक्तीला 2.5 कोटींच्या टर्नओव्हरसाठी GST नोटीस; लाखो रुपये भरण्याचे आदेश, जाणून घ्या प्रकरण
पूर्वी तो नरोरा येथील टाऊनशिप प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होत. येथून त्याला दिवसाला 300 रुपये मिळायचे. मात्र आता ते काम सुटल्यानंतर तो बेरोजगार आहे. अशा स्थितीत कोट्यावधी रुपयांच्या कंपनीचा तो मालक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत, ज्या बनावट पॅन आणि आधार कार्डद्वारे कंपन्या तयार करून जीएसटीमध्ये फेरफार करतात. यातील एका टोळीचा नुकताच सेक्टर-20 पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला होता. मात्र अजूनही अशा टोळ्या फसवणूक करत आहेत. नुकतेच याच्याशी निगडीत एक तक्रार सेक्टर-63 पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बुलंदशहरमध्ये (Bulandshahr) राहणारा देवेंद्र कुमार बेरोजगार आहे. मार्च 2023 मध्ये त्याच्या नावाने जीएसटीची सरकारी नोटीस आली. तेव्हापासून तो पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहे.
रिपोर्टनुसार, मार्चमध्ये त्याच्या नावावर 24.61 लाख रुपयांची जीएसटी नोटीस आली होती. त्यामध्ये तो 1.16 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक असल्याचे लिहिले होते. त्यानंतर काही दिवसांनी अशीच दुसरी नोटीस त्याच्यापर्यंत पोहोचली, ज्यामध्ये अजून एका 1.16 कोटी रुपयांच्या कंपनीचा उल्लेख होता. त्यानंतर देवेंद्र याने ताबडतोब पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. इंडियन एक्स्प्रेसशी संबंधित धीरज मिश्रा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, देवेंद्र म्हणतात की तक्रार दाखल करण्यासाठी त्याने कमीत कमी 40,000 रुपये खर्च केले आहेत.
देवेंद्र म्हणतो, तो खूप गरीब आहे. पूर्वी तो नरोरा येथील टाऊनशिप प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होत. येथून त्याला दिवसाला 300 रुपये मिळायचे. मात्र आता ते काम सुटल्यानंतर तो बेरोजगार आहे. अशा स्थितीत कोट्यावधी रुपयांच्या कंपनीचा तो मालक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. (हेही वाचा: Credit, Debit Cards Portability: आता ग्राहकांना मिळणार त्यांचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड Visa ते MasterCard निवडण्याची संधी)
देवेंद्रने पोलिसांना सांगितले की, तो दोन वर्षांपूर्वी नोएडा येथील एका कंपनीत काम करत असे. तो येथे पॅकिंग हेल्पर म्हणून काम करायचा. या कंपनीशी संबंधित कंत्राटदाराने त्याची कागदपत्रे वापरली असावीत, असा त्याला संशय आहे. पगारासाठी त्याने देवेंद्रचे आधार आणि पॅनकार्ड घेतले होते. त्यामुळे नोएडा पोलीस आता या प्रकरणाचा त्या दृष्टीने तपास करत आहेत. याप्रकरणी 8 जुलै रोजी नोएडा सेक्टर-63 पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. आयपीसी कलम 420, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.