Akhilesh Yadav: अखिलेश यादव यांचा प्रवेश झालेला मंदिर परिसर भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरुन स्वच्छ केला
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील वातावरण चांगलेच तापले आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हे मंदिर गंगाजलने स्वच्छ केल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरुन समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये आता आरोप प्रत्यारोप हा सुरु झाला आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 39.22 टक्के मतदान; महाराष्ट्रात सर्वात कमी, तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान)
अखिलेश यादव हे मागासवर्गीय आहेत. त्यामुळेच भाजपाने मंदिर परिसर गंगाजलने स्वच्छ केला, तसेच मागास, दलित, वंचित आणि शोषित घटकांना हिंदू मंदिरात पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, असे भाजपाचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जनता भाजपाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आय.पी. सिंह यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हाही भाजपाने मुख्यमंत्री निवास गंगाजलने स्वच्छ केले होते. यावरूनच भाजपाची मानसिकता दिसून येते, असेही ते म्हणाले.
दरम्यान अखिलेश यादव यांनी मंदिराला दिलेल्या भेटीबाबत आमचा कोणाताही आक्षेप नाही. मात्र, यावेळी अखिलेश यादव यांच्याबरोबर काही मुस्लीम नेतेही मंदिरात दाखल झाले होते. त्यांनी बूट घालून मंदिर परिसरात प्रवेश केला. त्यामुळे आम्ही गंगाजलने मंदिर परिसर स्वच्छ केला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष शिवेंद्र कुमार ग्वाल यांनी दिली.