मोफत गॅस सिलिंडर आणि प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध, कर्नाटकात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

युगाडी, गणेश चतुर्थी आणि दिवाळी या तीन सणांना हे सिलिंडर सरकारकडून मोफत असतील.

Karnataka BJP (Image Credit - BJP Twitter)

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणूकीचा (Karnataka Assembly Election ) प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस उरल्याने सर्वच राजकीय पक्षाने प्रचारात आपला जोर लावाल्याचे दिसत आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) तर भाजपाकडून खुद्द नरेंद्र मोदी (Narendra Modi) मैदानात उतरले असल्याने प्रचाराला आणखी वेग आलेले दिसत आहे. या दरम्यान भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये शेतकरी, सामान्य नागरिक, व्यावसायिक यांना आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटकात जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही उपस्थित होते.

कर्नाटकात जर भाजप सत्तेत आला तर दरवर्षी बीपीएल कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार आहे. युगाडी, गणेश चतुर्थी आणि दिवाळी या तीन सणांना हे सिलिंडर सरकारकडून मोफत असतील. राज्यभर स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार देण्यासाठी भाजपा राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात ‘अटल आहार केंद्र’ सुरू करणार. तर, पोषण्णा योजनेअंतर्गत भाजपा बीपीएल कुटुंबांना प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध देणार आहे.

‘मिशन स्वस्थ कर्नाटक’ च्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्यात येणार आहे. महापालिकांच्या प्रत्येक प्रभागात नम्मा क्लिनिकची स्थापना करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य वार्षिक आरोग्य तपासणी सेवा सुरू करण्यात येणार आहे. पुढच्या पिढीसाठी बंगळुरूला स्टेट कॅपिटल रिजन म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामार्फत एक व्यापक, तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली शहर विकास कार्यक्रम राबवला जाईल.