Minor Boy Casting Vote Controversy: भाजप नेत्याचे अल्पवयीन मुलाकडून मतदान; Video व्हायरल होताच फुटले वादाला तोंड
हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील बेरासिया (Berasia Assembly) परिसरातील मतदान केंद्रावरील असल्याचे सांगितले जात आहे.
अल्पयीन मुलगा लोकसभा निवडणूक 2024 साठी होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल (Minor Boy Casting Vote Controversy) झाला आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील बेरासिया (Berasia Assembly) परिसरातील मतदान केंद्रावरील असल्याचे सांगितले जात आहे. हे मतदान केंद्र बेरासिया विधानसभा मतदारसंघात येते. दरम्यान, दावा केला जात आहे की, व्हिडिओत(Vote Controversy Video) दिसणारा मुलगा भाजप नेत्याचा आहे. व्हिडिओ ऑनलाईन आल्यावर आणि व्हायरल झाल्यावर एकच गदारोळ उडाला. राजकीय वर्तुळात या व्हिडिओवरुन मोठी खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाने व्हिडिओची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
अल्पवयनी मुलगा भाजप नेत्याचा पूत्र
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एकूण 14 सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा हा मुलगा भारतीय जनता पक्षाशी (भाजप) संबंधित स्थानिक पंचायत नेता विनय मेहर यांचा मुलगा आहे. मंगळवारी कथितपणे समोर आलेल्या फुटेजमध्ये, अल्पवयीन मुलगा त्याच्या वडिलांसोबत मतदान केंद्रात गेला आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) वर मतदान करताना दिसत आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी रायबरेली येथील झारखंडेश्वर मंदिरात केली प्रार्थना)
काँग्रसकडून व्हिडिओवर आक्षेप
14 सेकंदांचा व्हिडिओ, कथितपणे भाजप नेत्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला गेला होता. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या मीडिया सल्लागार विभागाने या व्हिडिओवर आक्षेप घेत भाष्य केले. व्हिडिओ क्लिपमध्ये वडील आणि मुलगा दोघेही मतदान केंद्रात दिसत आहेत. व्हिडिओमध्ये असेही दिसते की, वडील मुलाला भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळसमोरील बटण EVM वर बटण दाबण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यानंतर, फुटेजमध्ये व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) मशीनद्वारे मत नोंदवले जात असल्याचे दिसून येते. त्यानंतर मेहीर यांनी म्हटले आहे की, ठिक आहे. आता मतदान पूर्ण झाले.
निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन वापरास आणि चित्रिकरण करण्यास परवानगीच कशी दिली गेली. तसेच, लहान मुलांना मतदान केंद्रात प्रवेश करता येतो काय, जरी त्यांना प्रवेश दिला तर त्यांना मतदान करता येते काय? त्याबाबत काही नियम, संकेत आहेत काय? असे एक ना अनेक प्रश्न या व्हिडिओच्या अनुषंघाने उपस्थित झाले आहेत.
व्हिडिओ
काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे माध्यम सल्लागार पीयूष बाबेले यांनी व्हिडिओवर आक्षेप घेत म्हटले आहे की, "भाजपने निवडणूक आयोगाला लहान मुलांचा खेळ बनवले आहे. भोपाळमध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान करायला लावले. विनय मेहर यांनी मतदान करतानाचा व्हिडिओही बनवला आहे. विनय मेहर यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे."
निवडणूक आयोगाकडून 'नो कमेंट्स'
दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असला तरी, अद्यापपर्यंत तरी निवडणूक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र या व्हिडिओची सत्यता मान्य केली आहे. जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिवाय, पीठासीन अधिकारी संदीप सैनी यांना निलंबित करण्यात आले असून, भाजप नेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.