IPS Officer Shivdeep Lande Resigns: आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा; तडकाफडकी निर्णयाचे कारण गुलदस्त्यात

मुळचे महाराष्ट्रातील असलेले लांडे हे बिहार येथे सेवा देत होते. आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंगम अधिकारी अशी त्यांची ओळख होती.

Shivdeep Lande | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे (IPS Officer Shivdeep Lande Resign) यांनी भारतीय पोलीस सेवेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुळचे महाराष्ट्रातील असलेले लांडे हे बिहार येथे सेवा देत होते. आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंगम अधिकारी अशी त्यांची ओळख होती. सोशल मीडियावर त्यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पूर्णियाचे आयजी म्हणून सूत्रे स्वीकारली होती. तिरहुत या विस्तारीत प्रदेशातून त्यांना पूर्णियामध्ये बदली करण्यात आली होती. त्यामुळे हे अधिकारी नाराज होते असे समजते. त्यानंतर काहीच काळात त्यांनी राजीनाम्याची घोषणा केल्याचे पुढे आले.

सोशल मीडियावरुन राजीनाम्याची माहिती

शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावरुन माहिती देताना आपण आपल्या व्यक्तिगत कारणांमुळे भारतीय पोलीस सेवेचा राजीमा दिल्याचे म्हटले आहे. आयजी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, मी राजीनामा दिल्याचे वृत्त खरे आहे. मी काही व्यक्तिगत कारणांमुळे नोकरीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही व्यक्तिगत कारण पुढे करत राजीनामा सोपवला होता. (हेही वाचा, Andhra Pradesh: अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक, तीन अधिकारी निलंबित)

सोशल मीडिया पोस्टमध्ये बिहारमध्ये राहण्याची घोषणा

शिवदीप लांडे यांनी गुरुवारी दुपारी सोशल मीडियावरुन घोषणा केली तेव्हा बिहार पोलीस दलात खळबळ उडाली. वर्दीमध्ये तिरंग्याला सलामी देतानाचा फोटो शेअर करत लांडे यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहीली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, माझ्या प्रिय बिहार, पाठिमागील 18 वर्षांपासून सरकारी पदावर आपली सेवा बजावल्यानंतर मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. या सर्व वर्षांमध्ये मी बिहारला माझ्या कुटुंबापेक्षाही अधिक प्रिय मानले. जर माझ्याकडून एखाद्या सरकारी कामात त्रुटी राहिली असेल तर मला क्षमा असावी. मी आज भारतीय पोलीस सेवेचा (IPS) राजीनामा दिला आहे. परंतू, मी बिहारमध्येच राहीण आणि पुढेही माझी कर्मभूमी बिहारच राहीन. (हेही वाचा, फक्त 8 वी पास तरुणाने IPS अधिकारी असल्याचे भासवून केली अनेक महिलांची फसवणूक; लाखो रुपये उकळले)

दरम्यान, शिवदीप लांडे हे मुळचे महाराष्ट्राचे आहेत.ते शिंदे गटाचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत. मधल्या काळात ते महाराष्ट्रातही परतले होते. दरम्यान, बिहारला परतल्यानंतर त्यांना विविध ठिकाणी पोस्टींगही मिळाली. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी बिहारमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. काहींनी म्हटले आहे की, ते राजकारणात पदार्पण करु शकतात. लांडे यांची बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठी फॅनफॉईंग आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना राजकीय क्षेत्र खुणावू शकते, असाही कयास काहींनी लावला आहे. मुंबईमध्येही माजी पोलीसआयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.